Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आले तेल तवंगाचे गोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:07 IST

किनारे स्वच्छ करण्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचे आदेशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या तीन दिवसांपासून गिरगावसह जुहू चौपाटीवर वाहून आलेल्या ...

किनारे स्वच्छ करण्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून गिरगावसह जुहू चौपाटीवर वाहून आलेल्या तेलाच्या तवंगाच्या गोळ्यांमुळे येथील किनारे प्रदूषित झाले आहेत. हे समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश आता नगरविकास विभागाला मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत.

तौक्ते चक्रीवादळाने समुद्र किनाऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. या चक्रीवादळामुळे समुद्रातील ज्या बोटी, जहाजांची हानी झाली त्यातून हे तेल आता समुद्र किनारी आले असावे, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला. याबाबत वॉचडॉग फाऊंडेशनचे गॉडफ्रे पिमेंट यांना सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून गिरगावच्या समुद्र किनारी तेल वाहून येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. आमच्याकडे आतापर्यंत गिरगावबाबत तक्रार आली आहे. इतर समुद्र किनारीदेखील असे तेल वाहून आले असावे.

आम्ही याबाबत प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबईच्या समुद्र किनारी मोठे प्रदूषण आहे. त्यात आता असे तेल वाहून येत असल्याने प्रदूषणात भर पडली आहे. कोरल नावाची प्रजाती येथे आढळत असून, त्यांनाही यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. मरिन ड्राइव्ह, कुलाबा, हाजी अली आणि वरळी येथे मोठ्या प्रमाणावर कोरल आहेत. अशा प्रदुषणाचा समुद्री जिवांसोबतच मनुष्यालाही मोठा फटका बसतो. पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे योग्य ती कार्यवाही करावी, असे पिमेंटा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले असून याचा ई-मेल नगरविकास विभागालाही पाठवला आहे.