Join us  

बालभारतीची नवी पुस्तकं फेकून द्या, 'वीस एक', 'सत्तर दोन'वरून कपिल पाटील खवळले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 11:52 AM

लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणाच्या धोरणावरून राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

मुंबईः लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणाच्या धोरणावरून राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. बालभारतीने संख्यावाचनात नवी पद्धत आणल्यानं अनेक पालक संभ्रमात आहेत. आता 'बत्तीस'ऐवजी 'तीस दोन', असं म्हणायचं असं या पुस्तकात दिलं असल्यानं लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनीही राज्य सरकार आणि शिक्षण मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज्य सरकारनं बालभारतीच्या पुस्तकात केलेल्या बदलासंदर्भात मी तज्ज्ञांचा सल्ला घेतला, जेव्हा मी ही गोष्ट शिक्षण तज्ज्ञांना सांगितली तेव्हा तेसुद्धा उडाले. शिक्षणाचा विनोद झाला आहे, मराठी मारण्याचा सरकारचा डाव आहे, बालभारतीची नवी पुस्तकं फेकून द्या, अशा भावनाही कपिल पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. बालभारतीने दुसरीच्या गणित पुस्तकात मोठा बदल केला आहे. दुसरीच्या गणित पुस्तकातील संख्या वाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असे वाचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मराठी जोडाक्षरे कठीण असल्याचा हवाला देत बालभारतीने या नव्या पद्धतीची अंमलबजावणी केली आहे. पुस्तकात नवी व जुनी पद्धत अशा दोन्ही स्वरुपात मांडणी देण्यात आली आहे. मात्र ही देत असताना शिक्षकांनी नवीन पद्धतीने शिकवावे, अशा सूचनाही शिक्षण मंडळानं केल्या आहेत.या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ तर उडाला असून, पालकही संभ्रमात पडले आहेत. तसेच सरकारकडून मराठी भाषेची गळचेपी होत असल्याचा रागही शिक्षक वर्ग आळवला आहे. संख्या वाचनासाठी तीन पद्धती देण्यात आल्या आहेत. यात विद्यार्थ्यांना जी सोपी वाटते ती पद्धत वापरता येऊ शकते. इंग्रजीतील संख्या वाचनपद्धतीनुसार ही पद्धत करण्यात आली आहे. इतर सर्व प्रादेषिक भाषांमध्येही संख्या वाचन हे इंग्रजीप्रमाणेच असते, असे तज्ज्ञांचे मत आहे.