Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उद्योग सेलच्या राज्य समन्वयक पदी उदय सावंत यांची निवड

By मनोहर कुंभेजकर | Updated: February 3, 2023 19:41 IST

गेली 30 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थक म्हणून उदय सावंत यांची ओळख आहे.

मुंबई-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सावंत यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या "उद्योग सेल"च्या महाराष्ट्र प्रदेश समन्वयक पदी नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रातील सर्व छोट्या मोठ्या उद्योजकांच्या सर्व अडचणी  सोडवून महाराष्ट्र उद्योगव्यवसायत १ नंबर वर राहण्यासाठी तसेच जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करून सर्वसामान्यांना त्याचा फायदा कसा होईल याकरिता शासन व उद्योजक यांच्या मध्ये सुसंवाद निर्माण करण्याकरिता पक्ष पातळीवर जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली आहे. 

गेली 30 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थक म्हणून उदय सावंत यांची ओळख असून विशेष करून मुंबई व कोकण भागात त्यांनी भरीव काम केलेले आहे. स्वतः ते विकासक आणि उद्योजक असल्यामुळे संघटनात्मक विकास व उद्योजक यांच्यात समन्वयकाची जबाबदारी ते पूर्ण करतील असा विश्वास  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या असून राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात जावून उद्योगांचे प्रश्न समजून घेवून मार्गी लावण्यासाठी  त्यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी बोलताना उदय सावंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या या जबाबदारी बद्दल व माझ्यावर दाखवलेल्या विश्वासा बद्दल मी शतशः ऋणी आहे. तसेच मुख्यमंत्री व उद्योगमंत्री हे  महाराष्ट्राच्या विकासाकरिता अहोरात्र करीत असलेल्या कार्याला हातभार लावण्याचा  माझा प्रयत्न असेल व या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उद्योजकांच्या संघटनांसोबत समन्वय साधून उद्योजकांचे प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी मी कटीबद्ध राहीन.

टॅग्स :शिवसेना