Join us
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच गाठी-भेटींचे सत्र

By admin | Updated: January 29, 2017 03:37 IST

निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या तारखेच्या आधीपासून उमेदवारांनी गाठी-भेटींचे सत्र सुरू केले आहे. २७ जानेवारीला एकाही उमेदवाराने अर्ज भरला नसला तरीही प्रभाग २२१

मुंबई : निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या तारखेच्या आधीपासून उमेदवारांनी गाठी-भेटींचे सत्र सुरू केले आहे. २७ जानेवारीला एकाही उमेदवाराने अर्ज भरला नसला तरीही प्रभाग २२१ मधल्या मतदारांना काही पक्षांच्या उमेदवारांचे चेहरे कळले आहेत. चर्नी रोड पूर्वेकडील सी वॉर्डमध्ये येणाऱ्या प्रभाग २२१ मध्ये प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उमेदवारांनी प्रचारासाठी सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या महापालिका निवडणुकांमध्ये २१८ असणाऱ्या प्रभागाचे विभाजन होऊन नवीन २२१ हा प्रभाग तयार करण्यात आला आहे. या प्रभागात फणसवाडी, विठ्ठलवाडी, भुलेश्वर, लोहार चाळ ही प्रमुख ठिकाणे आहेत. या प्रभागात रहिवासी क्षेत्र आणि बाजार यांचे मिश्रण झाले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये या प्रभागातून मतदान कोणत्या भागातून अधिक होईल, याचे ठोकताळे बांधणीचे काम सुरू आहे. या प्रभागात आता शिवसेनेचा नगरसेवक होता. आता हा वॉर्ड खुला असल्यामुळे प्रमुख पक्षांतून उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. आमदारांच्या नातेवाइकांसह अन्य इच्छुक रिंगणात उतरले आहेत. भारतीय जनता पक्षाने गेल्या काही दिवसांपासून जनसंपर्क वाढवण्यासाठी शक्कल लढवायला सुरुवात केली आहे. शिवसेनाही यात मागे नाही. शिवसेनेने आरोग्य शिबिर, स्मार्टकार्डच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू केला आहे. याचबरोबरीने इच्छुक उमेदवार हे वैयक्तिक पातळीवर सध्या लोकांच्या भेटी घेत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्षदेखील सक्रिय झाले आहेत. अजूनही कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळणार? हे जाहीर झालेले नाही. तथापि, प्रबळ दावेदार समजले जाणाऱ्या संभाव्य उमेदवारांनी प्रभागात फिरणे सुरू केले आहे. (प्रतिनिधी)