Join us  

अँटेलिया प्रकरणी दुसऱ्यांदा जामीन नाकारला; सचिन वाझे म्हणतो, अंबानींबद्दल आदर आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 6:14 AM

मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा नाहीच, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार २५ फेब्रुवारी २०२१ रोजी आढळली होती.

मुंबई : अँटेलिया स्फोटक तसेच मनसुख हिरेन हत्येप्रकरणी तळोजा तुरुंगात असलेल्या बडतर्फ एपीआय सचिन वाझे याला दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने शनिवारी नकार दिला. विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळला. विशेष म्हणजे वाझेचा जामिनासाठी दुसऱ्यांदा अर्ज होता.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पियो कार २५ फेब्रुवारी २०२१ रोजी आढळली होती. दरम्यान, या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च २०२१ रोजी कळव्यातल्या खाडीत सापडला. या एकूणच प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला.

खटला अग्राह्य आरोपांवर आधारित : सचिन वाझेभारताचे नागरिक या नात्याने उद्योगपती अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आपल्याला आदर आहे. इतकेच नव्हे तर आपल्या विरोधातील खटला अग्राह्य सामग्री व आरोपांवर आधारित आहे. यावर अवलंबून राहत खटला सुरू ठेवणे योग्य ठरणार नाही.

एनआयएचा युक्तिवाद काय?

मुंबई गुन्हे शाखेत सहायक पोलिस निरीक्षक असलेल्या सचिन वाझे याने कटाचा एक भाग म्हणून स्फोटके असलेली कार अँटिलियाच्या बाहेर पार्क केली होती. वाझेचा या गुन्ह्यात थेट सहभाग असून त्याने दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी कृत्य करणे, दहशतवादी टोळीचा सदस्य असणे, मनसुख हिरेनचे अपहरण आणि खून करणे तसेच गुन्हेगारी कट रचणे आदी स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये,  असा युक्तिवाद एनआयएने केला. तपासादरम्यान या प्रकरणात सचिन वाझे याला अटक करण्यात आली असून वाझेसह दहा जणांविरुद्ध यूएपीए कायद्यांतर्गत विविध कलमे लावण्यात आली. आहेत.

टॅग्स :सचिन वाझेमुकेश अंबानीमनसुख हिरण