लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिकेच्या जल विभागाच्या सहायक अभियंत्याला शिवीगाळ करून धमकी देणारे भाजपचे नगरसेवक हरीश कृष्णा भांदीर्गे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास न्यायालयाने नकार दिला.
सत्य परिस्थिती जाणून न घेता आरोपीने सरकारी कर्मचाऱ्याला धमकी दिली, तसेच शिवीगाळही केली. आरोपीने सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य करण्यापासून अडविले आणि जर आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला तर ते तपासाला सहकार्य करणार नाहीत, अशी भीती सरकारी वकिलांनी व्यक्त केली. तर सरकारी कर्मचारी त्याचे कर्तव्य बजावत असताना नगरसेवकाने त्याला धमकावले आणि मारहाण केली. अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्याला फोनवर धमक्या दिल्या तर संपूर्ण यंत्रणा पंगू होईल आणि हा ट्रेंड वाढतच जाईल, असे न्यायालयाने म्हटले.
जर याकडे दुर्लक्ष करून अटकपूर्व जामीन मंजूर केला तर कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांना चुकीचा संदेश जाईल, असे न्या. एम. जी. देशपांडे यांनी नगरसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना म्हटले. नगरसेवकाकडून दबाव यायला लागला तर पालिका आणि सरकारी यंत्रणा खिळखिळी होईल, असेही न्यायालयाने म्हटले.
कॉल करून केली शिवीगाळ
पालिकेच्या जल विभागाच्या सहायक अभियंत्याने केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना त्यांच्या पथकासह घाटकोपर (पश्चिम) येथील शर्मा शाळेला भेट देण्यास सांगितले आणि तेथील पाणी सुरू असलेले बंद करण्यास सांगितले. याचा उद्देश हाच होता की तेथील वृंदावन सोसायटीला पाणी मिळावे; मात्र याबाबत खातरजमा न करता हरीश यांना वाटले की, या कृतीमुळे वृंदावन सोसायटीतील पाणी पुरवठा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी अभियंत्याला कॉल करून शिवीगाळ केली व धमकी दिली. त्यांच्या या कृत्यामुळे अभियंत्याने पोलिसांत तक्रार केली. त्यामुळे अटकेच्या भीतीने हरीश यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला.