Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाेगस ‘क्लीन अप’ मार्शल टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:08 IST

टेंडरचा गैरवापर करत २० लाखांची फसवणूक; एकाला अटक, पाच फरारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बाेगस ‘क्लीन अप’ मार्शल ...

टेंडरचा गैरवापर करत २० लाखांची फसवणूक; एकाला अटक, पाच फरार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बाेगस ‘क्लीन अप’ मार्शल टोळीचा पर्दाफाश करण्यात चारकोप पोलिसांना मंगळवारी यश आले. भाईंदर येथील एका खासगी सुरक्षा संस्थेच्या नावाने मिळालेल्या टेंडरचा गैरवापर करून या टोळीने त्यांच्या साथीदारांना ‘क्लीन अप’ मार्शल म्हणून तैनात केले. या टाेळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी भूषण सिंहला अटक केली असून त्याच्या पाच साथीदारांचा शोध सुरू आहे.

कांदिवलीतील पालिकेच्या आर दक्षिण विभागात क्लीन अप मार्शल नियुक्तीसाठी भाईंदर येथील खासगी सुरक्षा कंपनी सैनिक इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड यांनी टेंडर भरले होते. मात्र त्याचे काम पाहणाऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आणि नंतर सुरक्षा कंपनीने त्याकडे लक्ष दिले नाही. परिणामी याचा फायदा एका टोळक्याने उचलला आणि स्वतःच्या साथीदारांना त्या ठिकाणी नियुक्त करत पैसे उकळण्यास सुरुवात केली. याची माहिती जेव्हा सुरक्षा कंपनीच्या मालकाला मिळाली तेव्हा त्यांनी चारकोप पोलिसात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर फसवणूक तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.

भूषणच्या चौकशीत या टोळक्याने त्यांच्या साथीदारांना बनावट ओळखपत्रही बनवून दिल्याचे उघड झाले आहे.

ज्यावर नारायण सिंह नावाच्या व्यक्तीची सही असून तोच यामागील मास्टरमाईंड असल्याचे समजते. त्यानुसार नारायण सिंह, अनिल सिंह, सुनील गुप्ता, प्रशांत कांबळे आणि अशोक साटम यांचा शोध पोलीस घेत आहेत. भूषणविरोधात चारकोपसह कांदिवली पोलिसातही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या टोळक्याने २० लाखांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समाेर आले असून अधिक चौकशी सुरू आहे.

* पालिका अधिकाऱ्यांवरही संशयाची सुई !

सैनिक इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशील गोलानी हा त्यांच्याकडे अकाउंटंट म्हणून काम करत होता. त्यानेच आर दक्षिणमध्ये नारायणच्या मदतीने टेंडर भरले होते. जे पालिकेने पास केले. मात्र २०१९ मध्ये गोलानीचा मृत्यू झाला आणि सुरक्षा कंपनीचे याकडे दुर्लक्ष झाले. याबाबत नारायणला पूर्ण कल्पना होती. त्यानुसार त्याने बाेगस क्लीन अप मार्शल तैनात केले. यात पालिका अधिकाऱ्यांनी त्याला मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलीस सत्य पडताळून पाहत आहेत.

......................................................