बदलापूर : हे शहर झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे या शहराचा नियोजित विकास करण्यासाठी पालिकेच्या हद्दीपासून ३ किमीपर्यंत असलेली गावे पालिकेत घेऊन पालिका क्षेत्राची हद्दवाढ महिनाभरातच करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कुळगाव-बदलापूर नगपरिषद निवडणुकीत भाजपा स्वबळावर निवडणूक लढवित आहे. या पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापुरातील कात्रप येथे आले होते. या वेळी भाजपाचे जे उमेदवार बिनविरोध निवडणूक आले, त्यांचा जाहीर सत्कार या वेळी करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, बदलापूर बदलण्याचे काम मी स्वत: करणार आहे. बदलापूर हे ग्रोथ सेंटर म्हणून घडविणार आहे. हे काम करत असताना हद्दवाढ केलेल्या गावांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्य शासनाने हद्दवाढ झालेल्या पालिका क्षेत्राच्या विकासासाठी ६०० कोटींची तरतूद केलेली आहे. येथे नाट्यगृह आणि पालिकेच्या प्रशासकीय भवनाची गरज असून त्या कामासाठी आपण आदेश दिलेले आहेत, असे ते म्हणाले.
बदलापूर पालिकेची हद्दवाढ महिनाभरातच
By admin | Updated: April 19, 2015 23:42 IST