Join us

बदलापूर शहरात ९ हजार बोगस मतदार

By admin | Updated: January 15, 2015 23:09 IST

कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल महिन्यात होणार असल्याने या निवडणूकीत इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात बोगस मतदारांची नोंद केली आहे.

पंकज पाटील, बदलापूरकुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल महिन्यात होणार असल्याने या निवडणूकीत इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागात बोगस मतदारांची नोंद केली आहे. मतदार याद्यांमध्ये ज्यांची नावे आहेत ते मतदार बदलापूरात राहतच नसल्याचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी उघड केले आहे. शहरात सरासरी ९ हजार बोगस मतदारांची नावे मतदार याद्यांत टाकल्याने या याद्यांचे पूर्ण परिक्षण करुन ही बोगस नावे वगळण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. बदलापूर नगरपरिषद क्षेत्र हे मुरबाड विधानसभा क्षेत्रात येत असल्याने मतदार याद्यांत नावे टाकण्याची कामे ही मुरबाडमधून होत आहेत. पालिकेच्या निवडणुका लवकरच असल्याने त्याआधी १ ते १७ डिसेंबर दरम्यान नव्या मतदारांची नोंदणी सुरु केली होती. या नोंदणीचा फायदा घेऊन बदलापूरातील काही इच्छुक उमेदवारांनी आणि काही नगरसेवकांनी आपल्या प्रभागात राहत नसलेल्यांचीही नावे मतदार याद्यांमध्ये टाकली आहेत. एवढेच नव्हे तर कर्जत, मुंबई, कोकण, पुणे, सातारा, सोलापूर, डोंबिवली आणि मुरबाड ग्रामिण भागातील नागरिकांची नावे बदलापूरच्या मतदार याद्यांत आहेत.