Join us

कुर्ल्यातील भुयारी मार्गात पाण्याचा निचरा न झाल्याने दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:06 IST

मुंबई : मागील काही दिवसांमध्ये कोसळलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. पावसाचा जोर ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी ...

मुंबई : मागील काही दिवसांमध्ये कोसळलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. पावसाचा जोर ओसरल्यानंतर अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा झालाच नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. कुर्ला पूर्व आणि पश्चिम परिसरांना जोडणाऱ्या कुर्ला रेल्वेस्थानक येथील भुयारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.

या भुयारी मार्गात पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते; परंतु या पाण्याचा अद्यापही निचरा न झाल्याने पादचाऱ्यांना या साचलेल्या पाण्यातून कसरत करत वाट काढावी लागत आहे. त्याचप्रमाणे अनेक दिवस होऊनही पाण्याचा निचरा न झाल्याने भुयारी मार्गात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रोगराईचा धोकादेखील निर्माण झाला आहे.

कुर्ल्याच्या भुयारी मार्गाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात दुरवस्था होते. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने हा भुयारी मार्ग अनधिकृत फेरीवाल्यांचा अड्डा बनला आहे.

भुयारी मार्गाची अर्धी जागा या फेरीवाल्यांनी व्यापल्याने पादचाऱ्यांना येथून चालताना त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे या भुयारी मार्गात अंधार असल्याने येथे बेघर नागरिक तसेच गर्दुल्ल्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. या भुयारी मार्गावर असणारे स्लॅबदेखील वारंवार कोसळत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या समस्या दूर करण्याची मागणी नागरिक करत आहेत.