अलिबाग : खराब रस्ते, गावठी दारु, सीआरझेडचे उल्लंघन आणि एसटी महामंडळासंदर्भातील प्रश्नांचा पाऊस आजच्या लोकशाही दिनात पत्रकारांनी पाडला. संबंधित प्रश्नांवर त्या त्या विभागाला तातडीने आदेश देत जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला चांगलेच कामाला लावले.जिल्ह्यातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग-कार्लेखिंड रस्ता असून तो धोकादायक बनला असल्याने वाहतुकीसाठी बंद करावा, अशी मागणी पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे निधी नसल्याने कामे करता येत नसल्याचे कारण जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ठेकेदाराला काळ््या यादीत टाकण्याच्या मागणीचाही प्रशासन गांभीर्याने विचार करीत असल्याचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सांगितले. जिल्ह्यात गावठी दारुचे धंदे तेजीत असल्याने ते तत्काळ बंद करावेत यासाठी भांगे यांनी दारुबंदी व उत्पादन शुल्क अधीक्षकांना दूरध्वनी करुन संबंधित ठिकाणी छापे टाकण्याचे आदेश दिले.अलिबाग एसटी स्थानकात मोठ्या संख्येने अनधिकृतपणे पार्किंग केले जाते. त्यासाठी या ठिकाणाहून फलाट उभारुन तेथून बस सोडण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना नागरिकांनी केली. याबाबत चाचपणी करण्यात येईल असे रायगड जिल्हा विभाग नियंत्रक ए.एस. गायकवाड यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गाड्यांसाठी प्रवासी आरक्षण करतात तरी देखील गाडीमध्ये बसण्यास आरक्षण असणाऱ्या प्रवाशाला जागा उपलब्ध होत नाही. यासाठी फलाटावर एसटी बस लागण्याआधी एसटीच्या दरवाज्यावर आरक्षणाची यादी चिटकवावी अशी सूचना करण्यात आली. त्यालाही गायकवाड यांनी तात्काळ मान्यता दिली. महसूल विभागातील १२ आणि जिल्हा परिषद विभागातील तीन अशी एकूण १५ निवेदने आजच्या लोकशाही दिनात प्राप्त झाली. यामध्ये महसूल खात्याशी संबंधित सात अर्ज जागेवर निकाली काढले, असून एकूण आठ अर्ज शिल्लक राहिले आहेत.
खराब रस्ते, अवैध दारूविक्रीच्या समस्येने गाजला लोकशाही दिन
By admin | Updated: December 1, 2014 22:48 IST