Join us  

व्हेंटीलेटरवरील बाळ २ तास अडकले कोंडीत; मार्ग मिळत नसल्याने डॉक्टर संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 9:57 AM

महामार्गावरील वाहतूककोंडीत रुग्णवाहिका मंगळवारी अडकल्याने चिमुकल्या बाळाची प्रकृती बिघडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : मुंबई-अहमदाबाद महामार्ग सध्या सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतूककोंडीच्या गर्तेत सापडत आहे. वसईतील रुग्णालयात जुळ्या झालेल्या एका बाळाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या बाळाला वाचवण्यासाठी मंगळवारी मुंबईकडे नेत असताना रुग्णवाहिका दोन तास वाहतूककोंडीत  अडकली. अथक प्रयत्नाअंती व्हेंटीलेटरवरील बाळाला मुंबईतील वाडिया रुग्णालयात नेले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महामार्गावरील वाहतूककोंडीत रुग्णवाहिका मंगळवारी अडकल्याने चिमुकल्या बाळाची प्रकृती बिघडली. या बाळाला वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईला नेत असताना रुग्णवाहिका  वाहतूक कोंडीत अडकल्याने नातेवाइकांसह डॉक्टरही संतापले होते.    

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सध्या वाहतूककोंडीचा फटका रुग्णांना नेणाऱ्या रुग्णवाहिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. अनेकदा वेळेत उपचार न मिळाल्यामुळे रुग्ण दगावत असल्याची माहिती रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनी दिली आहे.

प्रवासी, चालक हैराण    n महामार्गावर सिमेंट-काँक्रीटचे काम चालू असल्याने पेल्हार, वसई फाटा, सातीवली चढण, चिंचोटी, ते सनई ढाबापर्यंत वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक, प्रवासी नागरिक हैराण आहेत. n गुजरात आणि मुंबईला जाणाऱ्या दोन्ही लेनवर मंगळवारी वाहतूककोंडी झाली होती. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी असल्याने वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने हाकत असल्याने गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावरही वाहतूककोंडी होत आहे. n विरार ते घोडबंदर मुंबईकडे जाणाऱ्या दिशेने अवजड वाहनांची भर उन्हात सात ते आठ किलोमीटरची भली मोठी रांग दररोज लागत असल्याचे चालकांकडून सांगण्यात येते. महामार्गासंबंधी प्रशासनाचा एकही अधिकारी, कर्मचारी किंवा रोडचे काम करणाऱ्या ठेकेदारांचे कामगार रस्त्यावर नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :वाहतूक कोंडी