Join us  

बाबरीवरून पुन्हा खोदकाम! चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून शिवसेना, मनसे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 6:28 AM

अयोध्येतील बाबरी मशीद पाडली, तेव्हा बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते की शिवसेना तिथे गेली होती?

मुंबई :

अयोध्येतील बाबरी मशीद पाडली, तेव्हा बाळासाहेब ठाकरे तिथे गेले होते की शिवसेना तिथे गेली होती? कारसेवक हे हिंदू होते. ते बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते. ज्यांनी बाबरी पाडली, ते कदापि शिवसैनिक नव्हते, असे विधान करून वादाची राळ उडवून देणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून राजकीय- आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली. गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे बाबरीच्या आठवणींच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पडली, तेव्हा हे सगळे ‘उंदीर बिळा’त  लपले होते, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

मनसेनेही ट्वीट करत पाटील यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली. जोरदार टीका सुरू झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले. त्यानंतर पाटील यांनी बाजू मांडत ते वक्तव्य बाळासाहेबांबाबत नसून संजय राऊत यांच्याबद्दल होते, अशी सारवासारव केली. बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईत हिंदू जिवंत आहेत. बाबरी पडली, तेव्हा तेथे शिवसैनिक होतेच, पण भाजप किंवा शिवसेना पक्ष म्हणून ती पाडली गेली नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. 

शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीच्या पाटील यांच्या वक्तव्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, नाहीतर स्वत: राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, बाबरी पाडली त्यावेळी भाजपचे तत्कालीन उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी जाहीर केले होते, की बाबरी पाडण्यामध्ये भाजप वगैरे कोणी नाही. हे काम शिवसेनेेने केले असेल. तेव्हा बाळासाहेबांनी नपुंसक नेतृत्व म्हणून चीड व्यक्त केली होती. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी दिलेल्या मुलाखती पाहाव्यात.

बाबरीबाबत बाळासाहेबांना फोन आला तेव्हा ते बोलले होते, “माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे.” तेव्हा आताच्या पंतप्रधानांचे नाव कुठेही नव्हते, असे सांगताना ठाकरे यांनी फडणवीसांवरही टीका केली. आता कोणी त्या वयात शाळेच्या सहलीला गेले असतील आणि सांगत असतील आमच्या आजूबाजूने गोळ्या गेल्या. कोणी म्हणत असतील, आम्ही तुरुंगात होतो, मग इतकी वर्षे गप्प का होतात? असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर दंगली झाल्या त्यावेळी आमची सत्ता नव्हती, तरीही आम्ही मुंबई वाचवली. शिवसैनिकांनी काही दर्ग्यांनाही संरक्षण दिले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.मनसेकडून व्हिडीओचा दाखला मनसेच्या ट्वीटमध्ये व्हिडीओ असून बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांनी केलेल्या वक्तव्याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली.  बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांनी हा प्रसंग ऐकावा, असे त्यात म्हटले आहे.बाळासाहेबांचे महत्त्व कमी करण्याची चालही भाजपची चाल आहे. हळूहळू त्यांना बाळासाहेबांचे महत्त्व लोकांच्या मनातून कमी करायचं आहे. मनावर ओझं ठेवून जो दगड बसवलेला आहे, तो आता जड व्हायला लागलाय, अशी परिस्थिती भाजपच्या इथल्या नेतृत्वाची आहे. बाळासाहेबांचा अपमान करताहेत, त्यांचे तळवे किती दिवस चाटणार आहात. आता कुणाला जोडे मारणार आहात,  की स्वतः च स्वतःला मारणार आहात? बाळासाहेब आणि शिवसेनेचे नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही, अशी टीकाही उद्धव यांनी केली.

बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते? : शिंदे चंद्रकांत पाटील यांच्याशी आपण बोललो आहोत असे सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबरी पाडली तेव्हा आताचे माजी मुख्यमंत्री कुठे होते? त्यांना यावर बोलण्याचा अधिकार तरी आहे का, असा सवाल केला. बाबरी आंदोलनात कोणताही पक्ष नव्हता. सर्वच जण रामभक्त म्हणून सहभागी झाले होते.  बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली भूमिका जगजाहीर आहे. ‘गर्व से कहो, हम हिंदू है’, हा नारा बाळासाहेब ठाकरेंनीच दिला होता. बाबरी पाडल्यानंतर मुंबईत दंगल उसळली तेव्हा मुंबईचे रक्षण हे बाळासाहेबांनीच केले होते.  

बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांनीच परखड भूमिका घेत याचे समर्थन केले होते. तेव्हा राम मंदिराला ज्यांनी विरोध केला त्यांच्यासोबत जे आता सत्तेत सहभागी झाले आहेत, त्यांना आता बाबरीवर बोलण्याचा काय अधिकार आहे? अयोध्येत राम मंदिर बनावे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते, हे स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले, असे ते पुढे म्हणाले.

बाळासाहेबांबाबत श्रद्धा : पाटीलबाळासाहेबांबाबत माझ्या मनात श्रद्धा आहे. त्यांच्या अनादराचे पाप करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंमुळे मुंबईतील हिंदू जिवंत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या विधानावर मी टिप्पणी करणार नाही, फोन करून त्यांच्याशी बोलेन. मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला होता, त्यांनी स्पष्टीकरण करण्यास सांगितल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :बाबरी मस्जिद