Join us  

पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 2:55 AM

स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालये बांधण्यास केंद्र सरकार प्रोत्साहन देत असताना, मुंबईत मात्र शौचालये पाडण्यात येत आहेत.

मुंबई - स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक शौचालये बांधण्यास केंद्र सरकार प्रोत्साहन देत असताना, मुंबईत मात्र शौचालये पाडण्यात येत आहेत. घाटकोपर पश्चिमेकडील भटवाडीमध्ये विकासकाच्या फायद्यासाठी सार्वजनिक शौचालय पाडण्याचा घाट घातल्याचा आरोप करीत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे घाटकोपर तालुका अध्यक्ष सुदाम शिंदे यांनी सोमवारी पालिका आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी सतर्कता दाखवित त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.भटवाडी येथील राम जोशी मार्गावरील माता महाकाली सेवा मंडळ येथे शासकीय जमिनीवर ३८ आसनी शौचालय आहे. हे शौचालय धोकादायक ठरवून पाडण्याची कारवाई महापालिका करीत आहे.या परिसरात दुसरे शौचालय नसल्याने येथील दीड हजार रहिवाशांचीप्रचंड गैरसोय होणार आहे. या शौचालयाची जागा वाढविण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, उपोषण, मोर्चे, आंदोलनानंतरही महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे आपल्याला हे पाऊल उचलावे लागल्याचे त्यांनी सांगितले.‘शौचालय आताच धोकादायक कसे बनले?’हे शौचालय चांगल्या दर्जाचे असल्याचा अहवाल यापूर्वी देण्यात आला असताना, आता धोकादायक कसे ठरविण्यात येते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.प्रशासनाच्या या भूमिकेच्या निषेधार्थ शिंदे यांनी पालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनाबाहेर आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. एका छोट्या बाटलीतून त्यांनी रॉकेल आणले होते.मात्र, तिथे उपस्थित सुरक्षा रक्षकांनी त्यांचा इरादा ओळखून त्यांच्या हातातील बाटली खेचून घेतल्याने अनर्थ टळला. त्यानंतर, शिंदे यांना आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई