मुंबई : बाबाराव सावरकर यांनी ‘राष्ट्रमीमांसा’च्या माध्यमातून देशाला दिशा दिली, पण राज्यकर्त्यांनी तशी राजनीती न स्वीकारता, त्याच्याकडे पाठ फिरवल्यामुळेच देशाचा विकास व्हायला वेळ लागतो. आजचे नेतेसुद्धा त्या राजनीतीच्या ज्ञान लालसेने पछाडलेले नाहीत, अशी खंत सावरकर विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक दुर्गेश परुळकर यांनी व्यक्त केली.स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाबाराव सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ‘अंदमाननंतरचे बाबारावांचे कार्य’ या विषयावर ते बोलत होते. अंदमाननंतर बाबारावांनी राष्ट्रकार्यासाठी आवश्यक संहितेचा अभ्यास करून, ‘राष्ट्रमीमांसा’ हा ग्रंथ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही काळ राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना संदर्भ म्हणून वापरण्याचा सल्ला त्या काळी प्राध्यापक देत, पण नंतर दुर्लक्ष केले गेले. अंदमाननंतर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यातील अर्थ समजून घेण्यासाठी तेवढ्या बौद्धिक क्षमतेचे वाचक व्हायला हवेत, हे आजही विचारवंतांना जाणवते. आज धर्म, संस्कृती आणि भाषेवर होत असलेले आक्रमण थोपविण्यासाठी पाठ्यक्रमात त्यांची पुस्तके असायला हवीत, असेही त्यांनी सांगितले.संस्कृतीपासून दूर जाणे हे राष्ट्राच्या हिताचे कधीच नसते. त्यामुळे त्याचा आग्रह बाबारावांनी सातत्याने धरला. राजगुरुसारखे शिष्य व क्रांतिकारक त्यांनी घडविले. त्याचबरोबर, हिंदी भाषा संस्कृतनिष्ठ असायला हवी, यासाठी त्यांनी भाषा संमेलनाच्या आयोजनाचे कार्य केले. शरीराची साथ नसतानाही त्यांनी आयुष्यभर राष्ट्रहिताचेच कार्य केले. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते वाढविले. राष्ट्राचा गाडा योग्य मार्गावर नेला, असेही विवेचन दुर्गेश परुळकर यांनी केले. या वेळी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, ज्येष्ठ सदस्या सुमेधा मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
बाबारावांनी देशाच्या राजनीतीला दिशा दिली!
By admin | Updated: June 15, 2016 02:36 IST