मुंबई : आयुर्वेद ही भारतातील वैद्यकीय शास्त्रातील प्राचीन शाखा आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीत आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आयुर्वेद महत्त्वाची भूमिका बजावते. शीव येथील आयुर्विद्या प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय आणि शेठ रणछोडदास वरजीवनदास आयुर्वेदीय रुग्णालय गेली ६० वर्षे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. रविवार, २२ फेब्रुवारी रोजी या महाविद्यालयाचा षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा सकाळी १० वाजता माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात रंगणार आहे. शीवच्या आयुर्विद्या प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळामध्ये माजी विद्यार्थ्यांचाच समावेश असतो. त्यांनी या सोहळ््याचे आयोजन केले आहे. या सोहळ््यात ६० वर्षांची वाटचाल, आपले अनुभव माजी विद्यार्थी मांडणार आहेत. १९४८ साली आयुर्विद्या प्रसारक मंडळाची नोंदणी करण्यात आली. यानंतर १९५४ साली आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना झाली.सध्या या रुग्णालयामध्ये १४ विभाग कार्यरत आहेत. मंडळाच्या परिसरात एक एकर जागेवर सुमारे ३५० आयुर्वेदात सांगितलेले आणि इतर उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पुढच्या काळात रुग्णालयाची क्षमता वाढवण्याचा मंडळाच्या मानस आहे. महाविद्यालयात सध्या ५० सीट्स आहेत. छोट्या प्रमाणात येथे औषधनिर्मिती केली जाते. (प्रतिनिधी)
आयुर्वेदिक कॉलेजची आज षष्ट्यब्दीपूर्ती
By admin | Updated: February 22, 2015 02:04 IST