मुंबई : गेली साठ वर्षे चेंबूरमध्ये वेद्यकीय व्यवसायासोबत सामाजिक कार्य करीत असलेल्या डॉ.विनोदिनी प्रधान यांना इनरव्हील संस्थेचा २०२० सालचा मार्गारेट गोल्डिंग पुरस्कार जाहीर झाला आहे.
ग्रेट ब्रिटन व आयर्लंड इनरव्हील या संस्थांची स्थापना मार्गारेट गोल्डिंग यांनी १९२४ साली केली. त्यांनी सामाजिक कार्यांसोबतच पहिल्या महायुद्धात परिचारिकेचे काम केले होते. त्यांच्या नावाने इनरव्हील संस्थेतर्फे २००० सालापासून हा पुरस्कार दिला जातो.
२०२० साठी मुंबईतून डॉ.विनोदिनी प्रधान आणि हरनाम कोचर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ.प्रधान या इनरव्हील संस्थेच्या गेली ४२ वर्षे सभासद असून, चेंबूरमध्ये गेली ६० वर्षे वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. त्यांनी ५० वर्षांपूर्वी चेंबूर महिला समाजाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. तेथेच ३५ वर्षांपूर्वी काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह बांधून घेतले आणि जेवणाची सोय केली, ती तेथून इतरांनाही ते स्वस्त दारात विकत मिळण्यापर्यंत. महिलांना रोजगार मिळावा, म्हणून तेथे विविध उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते. मुलींना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेता यावा, म्हणून त्याच्या प्रशिक्षणाची सोय केली. संकटात सापडलेल्या महिलांसाठी स्त्रीचेतना संस्थेच्या उपाध्यक्ष असताना समुपदेशन केंद्र सुरू केले. मेधा पाटकर यांच्या स्वाधार केंद्रात त्या काम करीत आहेत. एड्स, संतुलित आहार, लैंगिक शिक्षण याबाबत शालेय, महाविद्यालयीन व प्रौढ लोकांसाठी त्या आरोग्य शिक्षण देतात.