दोन मुलींची हत्या करत वडिलांची आत्महत्या प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दोन मुलींची हत्या करत त्यांचे वडील अजगर अली जब्बार अली उर्फ बबली (४५) यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मुलींच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा तपास अधिकारी करत असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अली यांच्यासह त्यांच्या दोन मुली कनेन (१३) आणि सुझेन (८) यांचे मृतदेह कांदिवलीतील त्यांच्या कारखान्यात गुरुवारी सापडले. आर्थिक चणचण तसेच किडनीच्या आजारातून ग्रस्त असल्याने निराशेत त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या जवळ सापडलेल्या सुसाइड नोटवरून प्रथमदर्शनी वाटत असले तरी कांदिवली पोलीस या प्रकरणाची शहानिशा करत आहेत. अली यांनी मुलींना मारले की कोणा अन्य व्यक्तीचा या हत्येमध्ये सहभाग आहे, या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
दोन मुलींपैकी लहान मुलीच्या तोंडावर चिकटपट्टी लावली, त्यामुळे घुसमटून तिचा मृत्यू झाला तर मोठीला गळा दाबून मारण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन्ही मयत मुलींचे शवविच्छेदन अहवाल अद्याप आम्हाला मिळालेले नसल्याने मृत्यूचे नेमके कारण समजल्यानंतरच संबंधित व्यक्तीविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पोलीस याबाबत अली यांचे नातेवाईक तसेच मित्रमंडळींचे जबाब नोंदवत असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल.
...................................