Join us

तानसा वाळू तस्करीला आळा

By admin | Updated: December 17, 2014 23:23 IST

कोट्यावधींचा महसूल बुडवून बिनधास्तपणे तानसा अभयारण्यातल्या वाळूची तस्करी करणा-या वाळू चोरांना आळा

भरत उबाळे, शहापूरकोट्यावधींचा महसूल बुडवून बिनधास्तपणे तानसा अभयारण्यातल्या वाळूची तस्करी करणा-या वाळू चोरांना आळा घालण्यासाठी मुंबई महानगर पालिका, जिल्हा महसूल विभाग, वन्यजीव तसेच प्रादेशिक वनविभाग, जिल्हा ग्रामीण पोलिसांची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. चोरट्या लाकूड तस्करी सोबतच वाळूची रोज हजारो ब्रास ट्रक चोरी येथे सुरु होती. लाकूड, वृक्ष तोडीवर लक्ष ठेऊन असणाऱ्या वनविभागाचे नैसर्गिक साधन संपत्ती असलेल्या वाळू तस्करीकडे दुर्लक्ष झाले होते. वनविभागासोबतच महानगरपालिका, महसूल विभागही डोळेझाक करीत होते. याबाबत तानसात वाळू तस्करांचा धुमाकूळ या आशयाचे वृत्त सोमवारी (दि.१५) लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेऊन ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी शहापूरचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांना चौकशीची आदेश दिले आहेत. तर मुंबईमहानगर पालिकेने धरणक्षेत्रात किमान दिड कि.मी. पर्यंताचा वेध घेणारे सीसी कॅमेरे बसविण्याची कार्यवाही सुरु केली आहे. वाळू तस्कर नदी, नाल्यांच्या वाळू सोबतच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शिरून वाळूची चोरी करीत होते. शहापूर, वाडा, मोखाडा तहसीलदारांनी मंडळ निरिक्षक व तलाठ्यांना अशा चोरट्या वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. लोकमतच्या वृत्तानंतर वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी यंत्रणा सरसावल्या आहेत. यात वन्यजीवच्या ठाणे विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. वाळूची चोरटी वाहतूक रोखून स्थानिक आदिवासींना ठेके देऊन त्यांच्या हाताला रोजगार देण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे.