Join us  

मर्सिडीज चालकाची चिंधीगिरी, 60 रूपयांचा टोल चुकविण्यासाठी दाखविले खोटे पेपर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 9:58 AM

वांद्रे-वरळी सी लिंकवरील 60 रूपयांचा टोल चुकविण्यासाठी एका मर्सिडीज चालकाने खोटी कागदपत्र दाखविल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबई- वांद्रे-वरळी सी लिंकवरील 60 रूपयांचा टोल चुकविण्यासाठी एका मर्सिडीज चालकाने खोटी कागदपत्र दाखविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गाडी चालकावर फसवणूकीची तक्रार दाखल झाली आहे. गेल्या आठवड्यात गुरूवारी 8.20 वाजता ही घटना घडली असून भाविक भानूशाली असं खोटी कागदपत्रं दाखविणाऱ्या चालकाचं नाव आहे. 

मर्सिडीज गाडीवर प्रोटोकॉल स्टिकर होतं आणि चालकाने कारला टोल लागणार नसल्याचं लेटर सी लिंकवरील टोल कर्मचाऱ्याला दाखविली, अशी माहिती वांद्रे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पंडीत ठाकरे यांनी दिली आहे.  मर्सिडीज गाडीला मुंबई एन्ट्री पॉईंट, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील आयआरबी टोल, एमएसआरडीसी, नॅशनल हायवे 4 आणि पुणे-नाशिकचे टोल पॉईंट्स असे सर्व टोल डिसेंबर 2018पर्यंत भरायचे नसल्याचं त्या लेटरवर नमूद करण्यात आलं होतं, असं पोलीस अधिकारी ठाकरे यांनी सांगितलं. 

कार चालकाने दाखविलेल्या लेटरवर एमईपीएलचा लोगो होता तसंच कंपनीचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकांची स्वाक्षरी होती. मर्सिडीज चालकाने ते पत्र टोल कर्मचाऱ्याला दाखविल्यानंतर कर्मचाऱ्याला त्यावर संशय आला. त्याने लेटरची पूर्नतपासणी करण्यासाठी लेटरचा फोटो काढून तो त्याच्या वरिष्ठांना पाठविला. त्यावेळी सी-लिंकवर इतर गाड्या रांगेत उभ्या असल्याने टोल कर्मचाऱ्याने लेटर पाहून कार चालकाला जायला सांगितलं होतं. 

कार चालकाने दाखविलेल्या लेटरची तपासणी झाल्यावर ते लेटर बनावट असल्याचं समोर आलं. याप्रकरणी बनावट कागदपत्र बनविल्याची व फसवणूकीची तक्रार दाखलं केल्याचं पोलिसांनी सांगितलं. वांद्रे-वरळी सी-लिंकवर घडलेला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  दरम्यान, कार चालकाचा शोध घेण्यासाठी कारची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात पाठविण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.  

टॅग्स :वांद्रे-वरळी सी लिंकमुंबई