Join us

कच्चे मांस, कच्ची अंडी खाणे टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत काही ठिकाणी आढळलेल्या मृत कावळ्यांनाही ‘बर्ड फ्ल्यू’ची बाधा झाल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत काही ठिकाणी आढळलेल्या मृत कावळ्यांनाही ‘बर्ड फ्ल्यू’ची बाधा झाल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे कच्चे मांस आणि कच्ची अंडी खाऊ नयेत, असे आवाहन महापालिकेने मुंबईकरांना केले आहे. तसेच चिकन विक्रेत्यांनाही मास्क लावणे व स्वच्छता राखण्याची सूचना करण्यात आली आहे.

मुंबईत चेंबूर येथील टाटा कॉलनी परिसरात काही कावळे मृतावस्थेत सापडले होते. गिरगाव चौपाटी येथील बालोद्यानमध्येही गेल्या काही दिवसात १२ कावळे मृतावस्थेत सापडले आहेत. यापैकी काही कावळ्यांचे नमुने राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान येथे तपासणीसाठी पाठवले होते. यामध्ये दोन कावळ्यांना बर्ड फ्ल्यूची बाधा झाली असल्याचे आढळले.

त्यामुळे पालिकेच्या बाजार विभागामार्फत सर्व चिकन विक्रेत्यांना दुकानात मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. तसेच मांस हाताळताना विशेष काळजी घेणे आणि स्वच्छता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कच्चे मांस आणि कच्ची अंडी खाऊ नयेत, अशी सूचना महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आली आहे.