Join us

आशिष शेलार, अळवणी यांना अवमान नोटीस

By admin | Updated: November 27, 2015 02:57 IST

बेकायदेशीर होर्डिंगविरुद्ध उच्च न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही नवरात्रौत्सव व छटपूजेदरम्यान भाजपाची बेकायदेशीर होर्डिंग झळकल्याने उच्च न्यायालयाने भाजपाचे मुंबई

मुंबई : बेकायदेशीर होर्डिंगविरुद्ध उच्च न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही नवरात्रौत्सव व छटपूजेदरम्यान भाजपाची बेकायदेशीर होर्डिंग झळकल्याने उच्च न्यायालयाने भाजपाचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार व विलेपार्ले मतदारसंघातील आ. पराग अळवणी यांना गुरुवारी अवमान नोटीस बजावली. त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) दोन कार्यकर्त्यांवरही अवमान नोटीस बजावली. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेसह काँग्रेस, बसपा व रिपाइं या पक्षांना पुढील सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश दिले. गैरहजर राहिल्यास अवमान कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, बेकायदेशीर होर्डिंग्ज हटविण्याबाबत राज्यातील सर्व महापालिकांनी येत्या ५ डिसेंबरपासून विशेष मोहीम सुरू करावी आणि २६ जानेवारीपूर्वीपर्यंत शहर होर्डिंगमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी ८ जानेवारीला घेण्याचे न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने जाहीर केले.बेकायदेशीर होर्डिंग, पोस्टर, बॅनरविरुद्ध मुंबईच्या ‘जनहित मंच’ व सातारा येथील ‘सुस्वराज्य फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थांनी जनहित याचिका दाखल केली आहे. गुरुवारी या प्रकरणी सुनावणी झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव होर्डिंगवरील शुभचिंतकांच्या यादीत नसल्याने त्यांच्यावर अवमान नोटीस बजावण्यास न्यायालयाने नकार दिला, तर राष्ट्रवादी काँग्रेसने उच्च न्यायालयाने दिलेल्या नव्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी केली असल्याची माहिती अ‍ॅड. युवराज नरवणकर यांनी दिल्याने त्यांच्यावर अवमान कारवाई करण्यात आली नाही. होर्डिंगबाबतच्या तक्रार निवारण यंत्रणांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देण्याचे निर्देशही खंडपीठाने महापालिकांना दिले. या यंत्रणेवर तक्रार आल्यानंतर ७२ तासांत संबंधित तक्रारीवर कार्यवाही करा. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)