नवी मुंबई : प्रवाशाला एका फोनवर रिक्षा उपलब्ध होईल, असा संकल्प साकारला जात आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मुलुंड ते विक्रोळी दरम्यान ही सेवा सुरु केली आहे.
नागरिकांच्या प्रवासासाठी मुंबईत टॅक्सीबरोबरच रिक्षाचाही पर्याय नागरिकांपुढे आहे. त्यानुसार अनेक टॅक्सी संघटनांनी एकत्रित येऊन एका फोनवर टॅक्सी उपलब्ध करण्यात येते. त्याकरिता कूल कॅब, कॅब टॅब अशा अनेक कंपन्या कार्यरत आहेत. परंतु रिक्षांना देखील अशा प्रकारे एकत्रित करण्याचा प्रयत्न झालेला नाही. हीच बाब लक्षात घेऊन निखील जाधव यांनी ‘अपनी सवारी’ सुरु केली आहे. अपनी सवारीच्या माध्यमातून त्यांनी सुमारे शंभरहून अधिक रिक्षा चालकांना संघटित केले आहे. तर भविष्यात संपूर्ण मुंबई परिसरातील रिक्षा चालकांना त्यामध्ये समाविष्ट करण्याचा त्यांचा मानस आहे.
पहिल्या टप्प्याच्या प्रयत्नात त्यांनी मुलुंड ते विक्रोळी दरम्यानच्या रिक्षा प्रवासावर भर दिला आहे. या मार्गावर प्रवाशाला रिक्षा हवी असल्यास 8क्8क्क्6क्686 या क्रमांकावर एक फोन करावा लागेल. त्यावर आपल्याला जायच्या असलेल्या मार्गाची माहिती सांगितल्यास हव्या असलेल्या ठिकाणी रिक्षा उपलब्ध होईल. त्याचे शुल्क देखील मीटरच्या दराने आकारले जाणार आहे. फक्त या सुविधेचा लाभ घेतल्याचे काही अतिरिक्त शुल्क प्रवाशाला द्यावे लागणार आहे.(प्रतिनिधी)
या सुविधेमुळे प्रवाशांना घाईच्या वेळी रिक्षाचालकाचा नकार ऐकावा लागणार नाही. यापूर्वी मुंबईच्याच काही भागासह पुणो येथे असा संकल्प राबवण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु त्यास आवश्यक तसा प्रतिसाद लाभलेला नव्हता.