Join us

वाचकांबरोबर लेखकाचा संवाद घडायला हवा : यशवंत मराठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:06 IST

मुंबई : वाचकांशी संवाद साधायचा असेल तर त्यांच्या वातावरणाशी अनुकूल, असे लिखाण साहित्यिकांनी केले पाहिजे. मालिकांमध्ये हा प्रयत्न होत ...

मुंबई : वाचकांशी संवाद साधायचा असेल तर त्यांच्या वातावरणाशी अनुकूल, असे लिखाण साहित्यिकांनी केले पाहिजे. मालिकांमध्ये हा प्रयत्न होत असल्यामुळे ग्रामीण आणि मुंबई-पुण्याबाहेर त्यांना अधिक प्रेक्षक असल्याचे दिसून येते, असाच प्रयत्न लेखकांनी देखील अधिक प्रमाणात केला पाहिजे, असे मत लेखक यशवंत मराठे यांनी व्यक्त केले.

छपाई ते लेखणी या त्यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ग्रंथालीचे संपादक अरुण जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी विश्वस्त सुदेश हिंगलासपूर, धनश्री धारप आदी मान्यवर उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर विश्वस्त धनंजय गांगल यांनी लेखकाशी संवाद साधला. त्यावेळी यशवंत मराठे यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली.

मराठी भाषेचा ऱ्हास थांबवायचा असेल तर बोलीभाषा टिकवली पाहिजे. मराठी शाळा वाचवा, हा मुद्दा एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच ठीक आहे. बदलत्या वातावरणात नवी पिढी वृत्तपत्र वाचण्याऐवजी इंटरनेटवर ऑनलाईन बातम्या बघण्यात किंवा सर्च करून जाणून घेण्यात, तसेच पुस्तके वाचण्याऐवजी ती ऐकण्याकडे वळत आहेत. परदेशातील हे वारे भारतात देखील वाहू लागले आहेत. त्यामुळे आता परिवर्तनाला गृहित धरूनच मार्ग शोधले पाहिजेत, असे मत देखील त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

आपल्या लिखाणाची सुरुवात ही मित्रमंडळी तसेच परिचितांनी सूचवल्यानंतर एकेका विषयावर आवड म्हणून लिहीत असताना होत गेली. सहज चालताबोलता होणाऱ्या संभाषणातून नवनवीन विषय सूचत गेले आणि प्रसारमाध्यमातील स्तंभलेखनाप्रमाणे लिखाण होत गेले. यापुढील काळात ‘कृष्ण’ या विषयावरील लिखाणाचा संकल्प यशवंत मराठे यांनी व्यक्त केला. कृष्णाच्या प्रत्येक कृतीमागे एक विचार होता आणि हा विचार आजच्या नव्या पिढीला समजेल आणि रुचेल अशा पद्धतीने मांडण्याचा हा एक प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले.