Join us

मुख्यालयाच्या वातानुकूलित यंत्रणेवरून सभागृह तापले

By admin | Updated: August 12, 2014 04:12 IST

महापालिका मुख्यालयात नवीन वातानुकूलित यंत्रणा बसवण्याचा प्रस्ताव सोमवारी महासभेत आला

नवी मुंबई : महापालिका मुख्यालयात नवीन वातानुकूलित यंत्रणा बसवण्याचा प्रस्ताव सोमवारी महासभेत आला. यावेळी मुख्यालय सुरु होऊन अवघ्या चारच महिन्यात सुमारे दीड कोटीचे काम केले जात असल्याचा संताप विरोधकांनी व्यक्त केला, तर विद्युत विभागाच्या या कामांचे अंदाजपत्रक आयआयटीमार्फत तपासण्याची मागणीही करण्यात आली.सीबीडी येथे महापालिकेची नवी मुख्यालय इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन होऊन अवघे चारच महिने झालेले असताना तेथे विद्युत विभागाने काम काढले आहे. मुख्यालयात नवीन वातानुकूलित यंत्रणा बसवण्याचे हे काम असून त्यासाठी १ कोटी ४८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. सध्या या इमारतीत ४०० टन क्षमतेच्या दोन चिलर यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. त्यानंतर नव्या कामाअंतर्गत ही तिसरी यंत्रणा बसवली जाणार आहे. सोमवारी झालेल्या तहकूब महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहापुढे आला. यावेळी अवघ्या चारच महिन्यात मुख्यालयात हे काम होत असल्याने विद्युत विभागाच्या कार्यपध्दतीबद्दल नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी संशय व्यक्त केला. तसेच या नव्या मुख्यालय इमारतीत हवा खेळती राहण्यासाठी पर्यायी सोय नसल्याने लोक गुदमरत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे विद्युत विभागाच्या कामाची आयआयटीमार्फत तपासणी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांनी हे काम विद्युत विभागाला पूर्वीच का सुचले नाही असा टोलाही मारला. नगरसेवक वैभव गायकवाड यांनी मात्र या चिलर यंत्रणेची गरज असल्याचे सांगत, भविष्यात एखादी यंत्रणा बंद पडल्यास हेच विरोधक ओरडतील असा आरोप केला. यावेळी मुख्यालयातील सध्या असलेल्या दोन चिलर यंत्रणांपैकी एखादी बंद पडल्यास पूर्व खबरदारी म्हणून ही तिसरी यंत्रणा बसवली जात असल्याचे विद्युत अभियंता जी.व्ही. राव यांनी सांगितले. तर आपणचा हा प्रस्ताव सुचवला असल्याचेही पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी सांगितले. आपण कार्यभार स्वीकारला त्यावेळी या मुख्यालयात पंख्यांची कमतरता समोर आली. त्यामुळे छोट्याशा गोष्टीची बाधा नको म्हणून ही नवी यंत्रणा बसवली जात असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)