Join us  

अत्यवस्थ गोविंदा केईएममधून खासगी रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 1:31 PM

उपचारासाठी महिनाभर या रुग्णालयात असलेल्या सूरज यांच्या नातेवाइकांनी डिस्चार्ज घेतला. आता  मीरा रोड येथील  खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंबई : दहीहंडीच्या उत्सवात काही गोविंदा जखमी झाले होते. त्यापैकी नालासोपारा येथील सूरज कदम हा गोविंदादहीहंडी फोडताना थरावरून कोसळला आणि जखमी झाला. मणक्याला जबर मार बसल्याने त्याच्या शरीराचा छातीपासूनचा खालचा भाग पूर्णत: लुळा पडला. त्याला के. ई. एम. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर शस्त्रक्रियासुद्धा करण्यात आली. उपचारासाठी महिनाभर या रुग्णालयात असलेल्या सूरज यांच्या नातेवाइकांनी डिस्चार्ज घेतला. आता  मीरा रोड येथील  खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.    आई-वडिलांचे छत्र कोरोनाकाळात हरपलेल्या सूरजला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. मामा सूरजचा सांभाळ करतो. सूरजही फोर्टमधील एका कार्यालयात काम करून कुटुंबाची देखभाल करत होता. जनरल वॉर्डमध्ये आल्यावर त्याची काळजी घेण्याचा आमचा अनुभव फारसा चांगला नव्हता.  त्यामुळे त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले आहे, असे सूरजचे मामा सचिन जाधव यांनी सांगितले. तर सध्या तो व्हीलचेअरवर आहे. त्याच्या मानेला झालेली इजा खूप गंभीर होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. प्रकृती पूर्वपदावर येण्यासाठी जास्त वेळ लागतो, असे केईएम रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक्स विभाग प्रमुख डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :दहीहंडीगोविंदाहॉस्पिटल