Join us

भारीच! पालिकेच्या उद्यानांचे आकर्षण ठरतायेत 'पाषाण चित्रे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 16:50 IST

Mumbai News : दहिसर येथील तीन उद्यानांमधील दगडांवर विविध प्राण्यांची आकर्षक आणि बोलकी चित्रे काढण्यात आली आहेत

मुंबई - गेल्या सहा महिन्यांच्या लॉकडाऊन काळानंतर घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांच्या विरंगुळ्यासाठी पालिका उद्यान सज्ज होत आहेत. या अंतर्गत दहिसर येथील तीन उद्यानांमधील दगडांवर विविध प्राण्यांची आकर्षक आणि बोलकी चित्रे काढण्यात आली आहेत. या पाषाण चित्रांसोबत सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांचीही लगबगही सुरू झाली आहे. 

पालिका उद्यानात पर्यावरण विषयक प्रदर्शनांचे व कार्यशाळांचे आयोजन करणे, पर्यावरणाशी संबंधित विविध प्रारूपे (मॉडेल) उद्यानांमध्ये बसविणे, असे उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यानुसार विविध उद्यानांमध्ये असणाऱ्या पाषाणांवर चित्र काढण्याचा उपक्रम उद्यान खात्याने हाती घेतला आहे. याअंतर्गत प्रायोगिक स्तरावर राबविण्यात येत असलेल्या पहिल्या टप्प्यात दहिसर परिसरातील तीन उद्यानांमध्ये असणाऱ्या पाषाणांवर प्राण्यांची आकर्षक व बोलकी चित्रे काढण्यात येत आहेत. 

यापैकी दहिसर पूर्व येथील जरीमरी उद्यानात असणाऱ्या एका पाषाणावर 'पांडा' या प्राण्याचे चित्र साकारण्यात आले आहे. तर दहिसर पश्चिम परिसरातील जेन उद्यानातील एका मोठ्या पाषाणावर हत्तीचे चित्र काढण्यात आले आहे. तसेच दहिसर पूर्व परिसरातील शहीद तुकाराम ओंबळे स्मृती उद्यानातील एका पाषाणावर हरीण चितारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. मुंबईच्या पावसातही टिकून राहतील, असे रंग या पाषाण चित्रांसाठी वापरण्यात आले आहेत. यासाठी येणारा खर्च हा 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी' निधीमधून करण्यात येत आहे

टॅग्स :मुंबई