Join us  

केबल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहिन्यांकडून जाहिरातींचा सपाटा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 1:44 AM

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमावलीच्या अंमलबजावणीला एक महिन्याची मुदतवाढ मिळाली असली तरी हा तिढा अद्याप सुटलेला नाही.

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमावलीच्या अंमलबजावणीला एक महिन्याची मुदतवाढ मिळाली असली तरी हा तिढा अद्याप सुटलेला नाही. एकीकडे ग्राहक संघटना यामुळे केबलचे दर घटणार असल्याचा दावा करत असल्या तरी केबल चालक मात्र दर वाढणार असल्याचा दावा करीत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध वाहिन्यांनी आपापली दरपत्रके जाहीर केली आहेत. आवडीच्या जास्त वाहिन्या पाहण्यासाठी प्रेक्षकांना जास्त रक्कम भरावी लागणार आहे. तर, कमी वाहिन्या पाहिल्यास कमी दर आकारला जाईल. केबल चालकांनीदेखील हीच भूमिका मांडली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सर्वसामान्यत: अनेक घरांमध्ये लहान मुले, महाविद्यालयीन मुले, नोकरी करणाऱ्या व्यक्ती, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक या प्रत्येक वयोगटाची वाहिन्या पाहण्याची आवड स्वतंत्र असते. त्यामुळे एकूण पाहिल्या जाणाºया वाहिन्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी विविध ब्रॉडकास्टर्सनी स्टॅण्डर्ड डेफिनेशन (एसडी) वाहिन्यांची विविध पॅकेजेस जाहीर केली आहेत. एचडी वाहिन्यांसाठी हे दर अधिक आहेत.कमी किमतीत जास्त चॅनल देण्यावर भर

सीटी नेटवर्कने पाच पर्याय दिले असून त्यांची किंमत १८ वाहिन्यांसाठी ५२. ५० रुपयांपासून ४९ वाहिन्यांसाठी १६६ रुपयांपर्यंत आहे. प्रेक्षक आपल्या पसंतीचे पॅकेज स्वीकारू शकतील. सर्व पॅकेजवर १८ टक्के अतिरिक्त जीएसटी द्यावा लागणार आहे. डेन नेटवर्कने १० पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये १९९ रुपयांपासून २०३ वाहिन्यांसाठी ५३२ रुपयांपर्यंत पर्याय आहेत. १९९ च्या पॅकेजमध्ये फ्री टू एअरच्या वाहिन्या व तुरळक वृत्तवाहिन्या व काही मनोरंजन वाहिन्यांचा समावेश आहे. तर ५०० रुपयांच्या पॅकेजमध्ये अनेक वाहिन्यांचा समावेश आहे.

हॅथवेने भाषिक समूहांसाठी विविध पॅकेजेस उपलब्ध करून दिले आहेत. एअरटेलने ९९ रुपयांपासून ४७७ रुपयांपर्यंतचे पर्याय दिले आहेत. हॅथवेने आपला चॉइस २७१ रुपये १२६ वाहिन्या, आपला फॅमिली व फिक्शन पॅक ३५१ रुपये १२२ वाहिन्या, आपला फॅमिली व स्पोर्ट्स पॅक ३५० रुपये १२ वाहिन्या, हिंदी वाहिन्या २७० असे पॅकेज दिले आहेत.

स्टारने स्टार व्हॅल्यु पॅक १२ वाहिन्यांसाठी ४९ रुपये, स्टार मराठी व्हॅल्यु पॅक १३ वाहिन्यांसाठी ४९ रुपये, स्टार प्रीमियम पॅक मराठी २० वाहिन्यांसाठी ७९ रुपये असे दर जाहीर केले आहेत.

नि:शुल्क वाहिन्यांच्या पॅकेजसाठी मूळ पॅकेजच्या पहिल्या १०० वाहिन्यांसाठी १३० रुपये आकारण्यात येणार असून त्यासाठी नेटवर्क क्षमता शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र त्यापुढील प्रत्येकी २५ वाहिन्यांसाठी २० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

टॅग्स :मुंबई