Join us

बॉम्बस्फोटाची माहिती देण्यासाठी बैठकांना हजेरी लावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:14 IST

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट : पुरोहितची उच्च न्यायालयाला माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाच्या कटाबाबत सर्व माहिती ...

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट : पुरोहितची उच्च न्यायालयाला माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाच्या कटाबाबत सर्व माहिती मिळवून ती लष्कराला देण्यासाठी आपण या कटासंबंधी आयोजित केलेल्या सर्व बैठकांना उपस्थिती लावल्याचा युक्तिवाद या बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यातर्फे उच्च न्यायालयात बुधवारी करण्यात आला.

आपल्यावर ठेवलेले आरोप रद्द करावेत, यासाठी पुरोहित याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होती.

पुरोहित यांची वकील नीला गोखले यांनी न्यायालयाला सांगितले की, लष्कराला या बॉम्बस्फोटासंबंधी माहिती देण्याकरिता पुरोहित या सर्व बैठकांना उपस्थित राहायचा. पुरोहित केवळ त्यांचे कर्तव्य पार पाडत होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारकडून मंजुरी घेणे आवश्यक आहे.

भारतीय लष्कराकडून आणि मुंबईचे माजी सहायुक्त हिमांशु रॉय यांनी पुरोहितने दिलेल्या माहितीबाबत त्याचे वारंवार कौतुक केले आहे. त्या कागदपत्रांवरून मी हे निदर्शनास आणते की, ते त्यांचे कर्तव्य करत होते आणि याच कामासाठी त्यांना कारागृहात टाकण्यात आले, छळवणूक करण्यात आली आणि दहशतवादी ठरवले, असा युक्तिवाद गोखले यांनी केला.

एनआयएने त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी केंद्र सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे गोखले यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी २ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.