Join us

सतर्कतेने बलात्काराचा प्रयत्न फसला

By admin | Updated: September 27, 2014 03:07 IST

क्लासेसवरून घरी परतणाऱ्या २३वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी कुर्ला येथे घडली.

मुंबई : क्लासेसवरून घरी परतणाऱ्या २३वर्षीय तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी कुर्ला येथे घडली. नेहरूनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीचा जीव वाचला असून, २०१०मध्ये याच परिसरात झालेल्या सीरिअल बलात्कारामध्येही याच आरोपीच्या सहभागाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चेंबूरच्या सुमननगर येथे राहणारी ही तरुणी एमएच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असून, तिचे वडील सहार विमानतळावर सीमाशुल्क विभागात अधिकारी आहेत. बुधवारी ती चुनाभट्टी येथील एटीआयमध्ये फिल्डवर्क केल्यानंतर सायंकाळी ६च्या सुमारास घरी परतत होती. चुनाभट्टी ते सुमननगर हे १० मिनिटांचे अंतर आहे. मात्र मध्येच सायन-पनवेल मार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच वाहतूककोंडी असते. त्यामुळे शॉर्टकट रस्त्याने ती कुर्ल्याच्या शिवसृष्टी परिसरातून येत होती. दरम्यान, येथील गणेश मंदिराच्या बाजूला एका झुडुपातून तिच्यावर महादेव कौंडर (४५) या आरोपीने झडप घातली. कौंडरने तिला गवतामध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरोपीला विरोध केला. मात्र त्याने तिचे दोन्ही हात पकडून एका हाताने तोंड दाबले. काही वेळानंतर तरुणीने त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी मोठी झटापट केली. याच दरम्यान आरोपीने तिच्या तोंडावरील हात काढला. हीच संधी साधत तरुणीने आरडाओरडा सुरू केला. नेहरूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संजीवन खामकर हे याच दरम्यान परिसरात गस्त घालत होते. त्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आरोपीने खामकर यांना पाहताच तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. स्वत:ला वाचवण्यासाठी या आरोपीने नाल्यात उडी घेतली. खामकर हे एकटेच असल्याने आरोपीला पकडू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी विलास दरेकर आणि बाळासाहेब वळुंज या दोन सहकाऱ्यांना या घटनेबाबत फोनवर माहिती दिली. दोघांनीही या ठिकाणी धाव घेत या आरोपीला रोखून ठेवले. त्यानंतर अग्निशमन दलातील जवानांच्या मदतीने आरोपीला बाहेर काढले. (प्रतिनिधी)