डोंबिवली : सकाळच्या वेळेत बँकेसह अन्य व्यवहार करण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पाळत ठेवत त्यांचा पाठलाग करुन त्यांच्याकडील मुद्देमालाची बॅग हिसकावून पळ काढणे, काहीतरी घाण पडली असल्याचे कारण सांगून नागरिकांना भुरळ घालून त्यांच्याकडील मुद्देमाल चोरणे आदीं घटनांमुळे डोंबिवलीकर हैराण झाले होते. ही सर्व कृत्ये एका टोळीकडून होत असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार डिटेक्शन अधिकाऱ्यांनी सापळा रचत त्या टोळीतील एकाला अटक केली असून त्याच्या फरार साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.सय्यद चाँद बादशहा सय्यद बजरुद्दीन (४६) असे त्या पकडलेल्या सराईत चोराचे नाव आहे. या पोलिस ठाण्यात हसमुखलाल खंदेडिया (७३) या ज्येष्ठ नागरिकाने त्यांच्या हातातील एक लाख असलेली बॅग हिसकावून पळ काढण्यात आला होता. संदर्भातील तक्रार १९ मार्च रोजी दिली होती. ही घटना पूर्वेकडील गोविंदाश्रम हॉटेलनजीक दु. ३ वा. सुमारास घडली होती. घडना घडल्याचे समजताच या पोलिस ठाण्यातील गस्तीवर असलेल्या पोलिसांनी सतत त्या ठिकाणी पाळत ठेवली. विविध ठिकाणांहून माहिती घेतली, तसेच एका ठिकाणाहून मिळालेल्या सीसी फुटेजवरुन एक बॅग लिफ्टर लक्षात आला. त्यानंतर तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक महेश जाधव, आणि हवालदार युवराज तायडे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक अविनाश पाळदे यांनी बजरुद्दीन यास पकडले, त्याचवेळी अन्य साथीदारांचा पाठलाग केला असता ते सात-आठ पसार झाले. त्यांचा कसून शोध घेण्यात येत असून लवकरच त्यांचाही शोध लागेल असा विश्वास पळदे यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
डोंबिवलीत बॅगा पळविणारा सराईत चोर अटकेत
By admin | Updated: April 2, 2015 22:45 IST