Join us

राजेंद्र लोढा यांच्या डोक्यात खुर्ची मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : अलिबाग-विरार कॉरिडॉर प्रकल्पात बाधित होणाऱ्या प्रकल्पबाधितांचा प्रकल्पास विरोध आहे. या प्रकल्पासाठी शुक्रवारी जमीन मोजणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : अलिबाग-विरार कॉरिडॉर प्रकल्पात बाधित होणाऱ्या प्रकल्पबाधितांचा प्रकल्पास विरोध आहे. या प्रकल्पासाठी शुक्रवारी जमीन मोजणी केली जाणार होती. या प्रकल्पात एका विकासक कंपनीचे संचालक असलेल्या राजेंद्र लोढा यांच्या कंपनीची जमीन बाधित होत असल्याने ते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी विरोध करणाऱ्यांपैकी एकाने त्यांच्या डोक्यात खुर्ची घालण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांच्या अंगावर धावून गेला. त्याचबरोबर, युवामोर्चाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी जमीन मोजणीस विरोध करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखील पाच जणांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रकल्पात कंपनीची जमीन बाधित होत असल्याने लोढा आणि कल्याण भूमिअभिलेख कार्यालयाने शुक्रवारी सर्वेक्षण आयोजित केले होते. त्याच्याशी संबंध नसलेले लोकही त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी या सर्वेक्षणाला विरोध केला. यावेळी वादंग होऊन सावन पाटील उर्फ भगत यांनी लोढा यांच्या अंगावर धावून जात त्यांच्या डोक्यात खुर्ची घालण्याचा प्रकार घडला, तसेच अन्य गजानन पाटील, प्रेमनाथ पाटील, विकी पाटील आणि फकिरा काळण यांनी जमीन मोजणीस विरोध करून जमीन मोजणी होऊ दिली नाही. या प्रकरणी लोढा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चाैकट

दाेन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांची बैठक

प्रकल्पबाधितांना योग्य दराने मोबदला दिल्याशिवाय प्रकल्पासाठी जमिनीची मोजणी करू नये, या मागणीकरिता युवामोर्चाने दोन दिवसांपूर्वीच हेदुटणे गावात बैठक घेतली होती. त्या बैठकीत युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मोजणीस विरोध करून मोजणी उधळून लावली जाईल, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे.