मुंबई : शेजारणीशी किरकोळ वादातून तिच्यासह शेजारच्या एका दोन वर्षीय मुलीला आणि तिच्या आईला जाळण्याचा प्रयत्न एका इसमाने वांद्रे येथे केला. या दुर्घटनेत तिघी गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका इसमावर गुन्हा दाखल करत, त्याला शनिवारी मिरारोड परिसरातून अटक केली.अमरावती हरिजन (४६) यांचा ब्रेसलेट बनवून त्याची विक्री करण्याचा छोटासा व्यवसाय आहे. यावर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्या शेजारी राहाणाऱ्या दीपक जठ (२५) नामक इसमाने त्यांच्या मुलीची छेड काढली. या प्रकरणी हरिजन यांनी त्याला जाब विचारला. या रागात जठ हा शुक्रवारी नेहमीप्रमाणे ब्रेसलेट विक्री करण्यासाठी बसलेल्या हरिजन यांच्याकडे गेला. त्यानंतर, त्यांच्यावर त्याने बाटलीत भरून आणलेले रॉकेल ओतण्यास सुरुवात केली. त्या वेळी हरिजन यांच्या शेजारीच कांता इक्का नावाची शेजारीण तिच्या दोन वर्षांच्या मुलीसोबत बसली होती. त्यांच्याही अंगावर हे रॉकेल ओतले गेले. तितक्यात जठने त्याच्याकडे असलेल्या लायटरने हरिजन यांच्या कपड्यांना आग लावली. त्यामुळे हरिजन यांच्यासह कांता आणि तिची मुलगीदेखील भाजली. त्यानंतर, जठ हा घटना स्थळाहून फरार झाला.वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, हरिजन यांना भायखळ्याच्या मसीना, तसेच इक्का आणि तिच्या मुलीला सायन रुग्णालयात दाखल केले, तर जठविरोधात गुन्हा दाखल केला. वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे आणि त्यांनी तयार केलेली ८ पथके जठ याच्या मागावर होती. शनिवारी जठ हा मिरारोड परिसरात असल्याची माहिती ठाकरे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक मिरारोडला दाखल झाले आणि त्यांनी तिथला संपूर्ण परिसर पिंजून काढला. तेव्हा जठ हा मिरारोड स्टेशनला त्यांना दिसला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)
वांद्रे येथे लहानग्या मुलीसह दोघांना जाळण्याचा प्रयत्न
By admin | Updated: April 17, 2017 04:02 IST