Join us  

रिक्षाचालकावर हल्ला करणारे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 5:27 AM

रिक्षा चालकावर चाकूने वार करून त्याला लुटणाऱ्या दोघा तरुणांना दहिसर पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली.

मुंबई : रिक्षा चालकावर चाकूने वार करून त्याला लुटणाऱ्या दोघा तरुणांना दहिसर पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली. महंमद अर्शद नसरुद्दीन अन्सारी (वय २०, रा. शिवाजीनगर, बोरीवली) व नावेद मोहम्मद इलियास इद्रसी (वय १८, संजयनगर, कुर्ला) अशी त्यांची नावे आहेत. अंधेरीत एका रिक्षा चालकावर हल्ला करून ते पसार झाले होते. मात्र, दहिसर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे, कॉन्स्टेबल चंद्रकांत शिरसाट यांनी दाखविलेल्या शिताफीमुळे दोघांना पकडण्यात यश आले.दहिसर पोलिसांकडे घरफोडीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या मोईनुद्दीन निजामुद्दीन शेख याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी उपनिरीक्षक घार्गे व शिरसाट निघाले होते. पहाटे पावणेचारच्या सुमारास अंबावाडीमध्ये असलेल्या सुधीर फडके ब्रिजजवळ एक रिक्षा त्यांना दिसली. त्यातील मागे बसलेल्या दोघांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांनी रिक्षा अडवून विचारणा केली असता, चालक पसार झाला.दोघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे रक्ताने माखलेला चाकू मिळाला. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलूवाडी, गुलमोहर रोडवर राकेशकुमार रामनरेश गुप्ता (३३) या रिक्षावाल्याच्या छातीवर, डोक्यात आणि खांद्यावर तीन वार करून, त्याचा मोबाइल व पैसे जबरदस्तीने हिसकावून पसार झाल्याची कबुली दिली. दोघांना जुहू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, जखमी गुप्तावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :अटक