Join us  

महिनाभरापूर्वीच रचला होता हल्ल्याचा कट; फार्म हाउसवरील प्रयत्न फसल्याने गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 7:57 AM

गोळीबार करणाऱ्या बाइकस्वारांनी पनवेलमध्ये एक घर भाड्याने घेत सलमानच्या फार्म हाउस आणि घराची रेकी केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या वांद्र्यातील इमारतीतील घरावर झालेल्या गोळीबाराचा कट महिनाभरापूर्वीच शिजल्याची माहिती मिळाली आहे. गोळीबार करणाऱ्या बाइकस्वारांनी पनवेलमध्ये एक घर भाड्याने घेत सलमानच्या फार्म हाउस आणि घराची रेकी केली. पनवेलातील फार्म हाउसवरच सलमानवर हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, तो फसल्याने त्यांनी मुंबईत गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. 

फरार झालेल्या दोघा हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथे रवाना झाली आहेत. पनवेलमध्ये ज्यांच्याकडून हल्लेखोरांनी घर भाड्याने घेतले त्या व्यक्तीला आणि त्यांना जुनी बाइक विकत घेण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गोळीबाराच्या घटनेची दखल एनआयए व राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) या यंत्रणांनी घेतली असून त्यांनीही तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांना एका मध्यस्थामार्फत पनवेलमध्ये पाठविण्यात आले. तेथे ते महिनाभर भाड्याच्या खोलीत राहिले. सुटीत सलमान फार्म हाउसवर येतो तिथेच त्याला मारण्याचा हल्लेखोरांचा कट होता. मात्र, तो फसल्याचे सूत्रांनी सांगितले. गुन्हे शाखा अधिक चौकशी करत आहे.

टॅग्स :सलमान खान