Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला

By admin | Updated: October 30, 2016 00:16 IST

फेसबुकवर स्वच्छतेसंदर्भात पोस्ट टाकल्याचा राग मनात धरून माजी सरपंच व त्याच्या साथीदाराने मनसेचे उपविभाग अध्यक्ष शशिकांत कोकाटे यांच्यावर प्राणघातक हल्ला

डोंबिवली : फेसबुकवर स्वच्छतेसंदर्भात पोस्ट टाकल्याचा राग मनात धरून माजी सरपंच व त्याच्या साथीदाराने मनसेचे उपविभाग अध्यक्ष शशिकांत कोकाटे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला इजा झाली. कोकाटे यांच्यावर केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या पाच जणांविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. दरम्यान, मनसे पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करणार आहेत. कोकाटे हे स्टार कॉलनीत राहतात. गांधीनगर व पांडुरंगवाडी परिसराचे मनसेचे उपविभागाध्यक्ष म्हणून कोकाटे काम पाहतात. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट टाकली. त्यात ५०० रुपये घेऊन, बिर्याणी खाऊन मद्याचा घोट घेत जल्लोषात नगारा वाजवला. त्याचा त्रास विकल्या न गेलेल्या मतदारांना सोसावा लागत आहे. सणासुदीला या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्याठिकाणी अजिबात स्वच्छता केली जात नाही. फवारणी केली जात नाही. लाखो खर्च करून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना ही दिवाळी सुखसमृद्धीची जावो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोकाटे यांनी ही पोस्ट टाकल्यावर माजी सरपंच रवींद्र म्हात्रे यांचा पुतण्या सुरेश पाटील याचा त्यांना फोन आला आणि त्याने धमकी दिली. त्यानंतर, म्हात्रे यांनी धमकीचा फोन केला. मानपाडा रस्त्यावर कोकाटे यांना गाठून रवींद्र, सचिन पाटील, सुनील लॉण्ड्रीवाला व अन्य पाच जणांनी मिळून मारहाण केली. कोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)कोकाटेंचे काम लोकप्रतिनिधींना खुपले प्रोबेस कंपनीत स्फोट झाला, तेव्हा अनेकांना वाचवण्याचे काम कोकाटे यांनी केले होते. कोकाटे यांचे काम तेथील लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांत खुपत आहेत. कोकाटे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक केली नाही तर आंदोलन करू, असा इशारा मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिला.