मुंबई : कॅफे, रेस्टॉरन्ट, थिएटर्स यांसारख्या ठिकाणांना लक्ष्य करीत, लोकांना ओलीस धरणे, गोळीबारापाठोपाठ बॉम्बस्फोट करणे ही पद्धती पाहता, फ्रान्समधील हल्ला हुबेहूब मुंबई हल्ल्यासारखाच असल्याचे मत, २६/११ हल्ल्याच्या आॅपरेशनमध्ये सहभागी पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.२६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ९.४० वाजता दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ले सुरू केले, तर फ्रान्समध्ये रात्री दहा वाजता हल्ले सुरू झाले. मुंबईतील दहशतवादांनी लिओपोल्ड कॅफेतील लोकांना ओलीस धरत बेछूट गोळीबार केला होता. फ्रान्समध्येही सांगीतिकागृहात घुसून दहशतवाद्यांनी प्रेक्षकांना ओलीस धरत बेछूट गोळीबार केला. फ्रान्समधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी स्वत:ला स्फोटाने उडवून दिले. मुंबईत मात्र दहशतवाद्यांना जोवर पोलीस ठार करीत नाहीत, तोवर हल्ला सुरू ठेवण्यास त्यांच्या म्होरक्यांनी सांगितले. एवढाच फरक सोडला, तर या दोन्ही हल्ल्याची पद्धत एकसारखीच आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले, तसेच मुंबईतील हल्ल्याप्रमाणेच फ्रान्समध्येही एकाच वेळी अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला चढविला, असे सह-पोलीस आयुक्त देवेन भारती (कायदा-सुव्यवस्था) यांनी सांगतले.मुंबईत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी सीएसटीकडे जाण्यासाठी भाड्याने घेतलेल्या टॅक्सीतही बॉम्ब पेरले होते. फ्रान्समध्येही फुटबॉल स्टेडियमबाहेर अशाच पद्धतीने स्फोट करण्यात आले. फ्रान्सवर हल्ला करणारे दहशतवादी शस्त्रसज्ज होते, असे २००८ मध्ये एटीएसचे उप-महानिरीक्षक परमवीर सिंग यांनी सांगितले. कसाबला जेरबंद केल्यानंतर त्यांची चौकशी करणारे निवृत्ती पोलीस उपायुक्त तानाजी घाडगे यांनी सांगितले की, ‘कसाब सांगत होता की, आमच्या म्होरक्याने आम्हांला ‘मारो, मारो और मारो’ असे बजावले होते.’ फ्रान्समध्ये मात्र दहशतवाद्यांनी स्वत:ला ठार केले.मुंबईला २६/११ ला झालेल्या हल्ल्यानंतर सरकारने नियुक्त केलेल्या समितीचे सदस्य असलेले माजी आयपीएस अधिकारी व्ही. बालचंद्रन म्हणाले की, ‘या समितीने केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीवर आपण समाधानी आहोत. आम्ही सरकार आणि पोलिसांना एकूण २७ शिफारशी सादर केल्या आहेत. गुप्तचरांनी पुरविलेली माहिती व्यक्तिश: अधिकाऱ्यांना भेटून सादर केली पाहिजे आणि नेहमीप्रमाणे सामान्य बाब म्हणून ती दिली जाऊ नये, यावर आमचा भर होता.’पॅरिसमधील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी लंडनहून संपर्क साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून योग्य ती खबरदारी घेण्यास त्यांनी सांगितले.
फ्रान्समधील हल्ला मुंबई हल्ल्यासारखाच
By admin | Updated: November 15, 2015 02:04 IST