Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन उपनिरीक्षकांसह महिलेवर अ‍ॅट्रॉसिटी

By admin | Updated: February 1, 2015 01:52 IST

पूर्ववैमनस्यातून विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केलेल्या तक्रारदार महिलेसह दोन उपनिरीक्षकांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत.

भार्इंदर : पूर्ववैमनस्यातून विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केलेल्या तक्रारदार महिलेसह दोन उपनिरीक्षकांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे भार्इंदर पोलिसांनी तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. शहरात चर्मकाराचा व्यवसाय करणारे बाबुराव यादव यांचा एका महिलेशी गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. याप्रकरणी यादव यांनी २००६ मध्ये तिच्यासह इतर ११ जणांविरोधात भार्इंदर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात धरून त्या महिलेने भार्इंदर पोलीस ठाण्यात त्या वेळी कार्यरत असलेले उपनिरीक्षक अनिल पवार व रामचंद्र धामणे यांच्याशी संगनमत केले आणि आपल्या विरोधात विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप यादव यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी २०१० मध्ये मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली होती. तत्पूर्वी यादव यांची विनयभंगाच्या गुन्ह्यातून मुक्तता झाली होती. त्यांच्या तक्रारीची आयोगाने दखल न घेतल्याने अखेर त्यांनी जानेवारी २०१५ मध्ये जिल्हा सत्र न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर ३ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तक्रारदार महिलेसह उपनिरीक्षक पवार व धामणे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भार्इंदर पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)तिन्ही आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असला तरी संबंधित पोलीस अधिकारी सध्या अन्यत्र कार्यरत असल्याने त्यांच्या अटकेची शक्यता मावळली आहे. या गुन्ह्णाचा तपास पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़