Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या पोरींवर बापाकडून अत्याचार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:31 IST

मोहल्ला कमिटी मीटिंग दरम्यान झाले उघड :   नराधमाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बायको घर सोडून गेल्यानंतर पोटच्या दोन पोरींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास मालाड पोलिसांनी बुधवारी अटक केली. मोहल्ला कमिटी मीटिंग दरम्यान शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार उघड झाला आणि दोघींची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले.

मालाड पश्चिम परिसरात राहणाऱ्या या आरोपीला बारा, नऊ आणि पाच वर्षांच्या तीन मुली आहेत. वर्षभरापूर्वी त्याची पत्नी घर सोडून निघून गेली. त्यानंतर त्याने या दोघींना स्वतःच्या वासनेची शिकार बनवले. मालाड पोलिसांकडून काही दिवसांपूर्वी मोहल्ला कमिटी मीटिंग आयोजित करण्यात आली होती. 

त्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या महिलेने याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि अखेर त्यांनी त्या व्यक्तीच्या घरी धाड टाकली. तेव्हा आक्षेपार्ह अवस्थेत असलेल्या बारा वर्षीय मुलीची त्यांनी सुटका केली. तिच्या नऊ वर्षांच्या बहिणीवरही असाच प्रकार बापाने केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. सर्वात लहान बहिणीला वाचविण्यासाठी घाबरून त्यांनी याची वाच्यता कोणाकडेही केली नव्हती. मात्र अखेर पोलिसांनी या मुलींना बालसुधारगृहात पाठविले असून बापावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

महिलेने दिली माहितीपीडितांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने मीटिंगमध्ये पोलिसांना याबाबत माहिती दिली.