Join us

मतदानावरुन गावठाणांमध्ये तणावाचे वातावरण

By admin | Updated: April 22, 2015 22:40 IST

शहरातील अनेक गावठाणांमध्ये मतदानानिमित्त तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गोठीवली, कुकशेत परिसरामध्ये दोन गटांमध्ये राडा झाला

नवी मुंबई : शहरातील अनेक गावठाणांमध्ये मतदानानिमित्त तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गोठीवली, कुकशेत परिसरामध्ये दोन गटांमध्ये राडा झाला. तुर्भे, दारावे, कोपरखैरणेसह अनेक ठिकाणी तणावामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. नवी मुंबईमधील मूळ गावठाणांमधील सर्व प्रभागांमध्ये प्रतिष्ठेची लढाई सुरू आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. बोगस मतदानावरून अनेक गावांमध्ये दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. गोठीवलीमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांच्याकडे बोगस मतदान होत असल्याची तक्रार केली. आयुक्तांनी याविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यास सांगितले. परंतु पाटील यांनी हुज्जत घातल्यामुळे त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील यांनाही ताब्यात घेतले होते. दिवसभर या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याचे कारण सांगून अनेकांना चोप देण्यात आला. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले होते. कुकशेत गावामध्येही राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. या ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. यामध्ये काही गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. कुकशेत व सारसोळे गावचा काही भाग मिळून एक प्रभाग झाल्यामुळे येथील तणाव वाढला होता. दारावे गावामध्येही बोगस मतदानावरून एका महिलेस मारहाण झाल्याची घटना घडली. तुर्भे गावात राष्ट्रवादी काँगे्रस व भाजपामध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे. प्रचारादरम्यानही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते. मतदानादिवशीही दिवसभर गावात तणावाचे वातावरण होते. मतदान केंद्र परिसरात सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना थांबण्यास मनाई केली होती. मतदान संपेपर्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोपरी, सानपाडा, कोपरखैरणे, शिरवणे, बोनकोडे व इतर गावांमध्येही तणावाची स्थिती होती. सिडको विकसित नोडपेक्षा गावठाणांमध्ये प्रचंड तणाव असल्याचे चित्र दिसत होते. (प्रतिनिधी)