पालघर : पालघर-माहीम रस्त्यावरील प्रशांत हॉटेल जवळच्या अॅक्सीस बँकेच्या एटीएममधील रोख रक्कम दोन चोरट्यांनी काल शनिवारी रात्री लुटण्याचा प्रयत्न पालघर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्यांचे साहित्य जप्त केले असून त्यांना लवकरच अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे. पालघर शहरात छोट्या मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पालघर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी रात्रीच्या बंदोबस्तात वाढ केली आहे. शनिवारी सहा. पो. नि. दीपक साळुंखे व कॉन्स्टेबल दिगंबर सांगळे व ग्रामसुरक्षा दलाचे शैलेश भट्ट हे पहाटे १.३५ च्या सुमारास माहिमरोडवर रात्रीची गस्त घालीत असताना अॅक्सीस बँकेच्या जवळ असलेल्या एटीएममधील मशीन तोंडावर रुमाल लावलेले दोन तरूण लोखंडी पहारीच्या सहाय्याने तोडत असल्याचे दिसले. दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतल्यावर त्यांनी तेथून पळ काढला. साईनगरपर्यंत हा पाठलाग सुरू झाल्यानंतर हे चोरटे झुडपाचा आसरा घेत पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी एटीएममध्ये लाखोची रक्कम असल्याची माहिती पुढे येत असून या एटीएममध्ये सुरक्षारक्षक नसल्याने पालघर पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे. या चोरीच्या घटनेवेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पांढऱ्या रंगाचा स्पे्रे असलेले रसायन पसरवून ही घटना रेकॉर्डिंग होऊ नये याची दक्षता घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले आहे. पालघर पोलिसांनी या प्रकरणातील गुन्हेगारी साहित्य जप्त केले आहे. (वार्ताहर)
पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली एटीएम चोरी
By admin | Updated: August 24, 2014 23:23 IST