Join us
Daily Top 2Weekly Top 5

काळा घोडा महोत्सवात टाकाऊ वस्तूपासून सादर केल्या आकर्षक कलाकृती

By मनोहर कुंभेजकर | Updated: February 9, 2023 14:25 IST

‘द रायझिंग ऑफ फिओनिक्स’चे  काळा घोडा कला महोत्सवातील त्यांचे हे दुसरे सादरीकरण  आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : तरुणाईचे आकर्षण असलेला ‘काळा घोडा महोत्सव’ ४ ते १२ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला आहे. या महोत्सवात वॉंडरींग व्‍हाईट्स हँडक्राफ्टेड ज्वेलरीच्या संस्थापक गौरी पाठारे यांनी आपली कलाकृती सादर केली आहे. ‘द रायझिंग ऑफ फिनिक्स’ ही टाकाऊ वस्तूंमधून साकारलेली त्यांची आकर्षक कलाकृती पाहण्यासाठी काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलमध्ये कलाप्रेमी आणि मुंबईकरांनी गर्दी केली आहे.

त्या एक अपारंपरिक कलाकार असून पितळ आणि तांब्याचा औद्योगिक कचरा, अपसायकल केलेले चामडे, नदीतील दगड- खडक, हाडे आणि नैसर्गिक तंतू यांचा विविध पद्धतीने पुनर्वापर करून त्या स्वतः हे अनोखे दागिने बनवतात. हे आगळे वेगळे दागिने बनवताना यंत्र-तंत्राचा कमीतकमी वापर आणि हाती केलेली कारागिरी जास्त असते. त्यांनी शाश्वत साहित्याचा वापर करून घालण्यायोग्य कलाविष्कार साध्य केला आहे. त्या असे म्हणतात की जगात शक्य तितके कार्बन फूटप्रिंट कमी करून प्रदूषण कमी करून एक निरामय प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नात हे त्यांचे एक छोटेसे कलात्मक योगदान आहे. 

काळा घोडा कला महोत्सवातील ‘द रायझिंग ऑफ फिनिक्स’ हे त्यांचे दुसरे सादरीकरण  आहे. हे साकारताना गौरी पाठारेंनी यांनी  टाकून दिलेले, मोडीत काढलेले आणि वाया गेलेले सामान वापरले आहे. निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या ह्या वस्तूंना त्यांनी जणू एक नवे जीवन, नवा अर्थ दिला आहे. गोदीतील गियर्स, जुन्या विंडो एसी, तुटलेली कार क्लच प्लेट, कॉपर एसी पाईप्स, फॅब्रिकेटरच्या कचऱ्यापासून पितळी प्लेट्स, इलेक्ट्रॉनिक मेटल वेस्ट, अगदी तुटलेले गोदरेज कुलूप देखील या कलाकृतीत नव्या अंदाजाने सामावले गेले आहे. त्यांचे आगळे वेगळे दागिने बनवताना ह्या टाकाऊ ठरविलेल्या वस्तूंचा हा पुनरुज्जीवनाचा प्रवास ह्या इन्स्टॉलेशनमधून आपल्या समोर आला आहे. मोडीत काढलेल्या वस्तूंचे एखाद्या फॅशनिस्टाच्या अनुपम दागिन्यांमध्ये केलेले हे अद्भुत रूपांतर म्हणजे  जणू राखेतून उठलेल्या फिनिक्स पक्षाची भरारीच!

टॅग्स :मुंबई