Join us
Daily Top 2Weekly Top 5

जन्मताच चिमुकलीला फेकले नाल्यात; अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

By मनीषा म्हात्रे | Updated: January 28, 2024 23:29 IST

मालाड पूर्व येथील नवजाला पाडा येथील नाल्यात अवघ्या एक दिवसाच्या नवजात मुलीला नाल्यात फेकलयाचा धक्कादायक प्रकार  शनिवारी समोर आला आहे.

मुंबईः मालाड पूर्व येथील नवजाला पाडा येथील नाल्यात अवघ्या एक दिवसाच्या नवजात मुलीला नाल्यात फेकलयाचा धक्कादायक प्रकार  शनिवारी समोर आला आहे. बाळाला काही होण्याच्या आधीच पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी मुलीला ताब्यात घेत रुग्णालयात दाखल केले. बाळ सुखरूप असून, याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवत, दिंडोशी पोलीस अधिक तपास करत आहे.

मालाड पूर्वेकडील जीतेंद्र क्रॉस रोडवरील यादव तबेल्याच्या शेजारील नाल्यात शनिवारी एक बाळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची वर्दी लागताच पोलिसांनी बाळाला ताब्यात घेत, पालिका रुग्णालयात नेण्यात आले. ती मुलगी असून पालकत्त्व नाकारण्याच्या उद्धेशाने तिला नाल्यात फेकण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. प्राथमिक तपासणीत एका दिवसांपूर्वीच मुलीचा जन्म झाल्याचा अंदाज असून याप्रकरणी अज्ञात पालकांविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार रमेश बोके यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलीस अधिक तपास करत असून नाला परिसरात कोणताही सीसीटीव्ही उपलब्ध नाही त्यामुळे महिलेचा शोध घेण्यास अडचणी येत आहे. आजूबाजूच्या परिसरातील  गर्भवती महिलांची माहिती घेण्यात येत आहे.