लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुंडलीतील ज्योतिषीय विसंगतीचा बहाणा देऊन विवाह करण्याचे दिलेले वचन मागे घेतले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने ३२ वर्षीय व्यक्तीची बलात्कार व फसवणुकीच्या आरोपातून मुक्तता करण्यास नकार दिला.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, बोरिवली पोलिसांनी अविशेक मित्रा याच्यावर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातून आपल्याला दोषमुक्त करण्यात यावे, यासाठी मित्रा याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मित्रा याचे वकील राजा ठाकरे यांनी न्यायालयात सांगितले की, जोतिषीय विसंगतीमुळे आरोपी व तक्रारदारमधील नाते पुढे जाऊ शकले नाही. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व फसवणूक केल्याचे हे प्रकरण नाही. ठाकरे यांचा हा युक्तिवाद न्या. संदीप शिंदे यांच्या एकलपीठाने अमान्य केला. सुरुवातीपासूनच आरोपीला तक्रारदार महिलेशी विवाह करायचा नव्हता, हे सुचविणारे अनेक पुरावे आहेत. जोतिषीय विसंगतीच्या सबबीखाली आरोपी महिलेशी विवाह करण्यास टाळत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले.
प्रथमदर्शनी, महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने कारवाई टाळण्यासाठी आरोपीने महिलेला विवाह करण्याचे आश्वासन दिले, असे न्यायालयाने म्हटले. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, २०१२ पासून आरोपी आणि तिची एकमेकांशी ओळख आहे. ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकत्र काम करत होते. विवाहाचे खोटे आश्वासन देऊन आरोपीने अनेक वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती गरोदरही झाली. याबाबत तिने आरोपीला माहिती दिली. मात्र, अजूनही आपण लहान आहोत आणि आपल्याला लग्न करायचे आहे, असे सांगत त्याने तिला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला. त्यानंतर डिसेंबर २०१२ पासून आरोपी महिलेला टाळत होता. तिने घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बोलावले आणि दोघांचेही समुपदेशन केले.
चौकट
युक्तिवाद अमान्य
जानेवारी २०१३ मध्ये आरोपीने तिच्याशी विवाह करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे महिलेने पोलीस तक्रारही मागे घेतली. तक्रार मागे घेतल्यावर आरोपीने जोतिषीय विसंगतीचे कारण देत महिलेशी विवाह करण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेने पुन्हा एकदा आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने मित्रा याचा युक्तिवाद अमान्य करत त्याला दिलासा देण्यास नकार दिला.