Join us  

सहाय्यक आरटीओच्या ट्रेनिंगसाठी १.८४ कोटी मोजावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 9:16 PM

प्रशिक्षणासाठी येणाऱ्या खर्चाच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.

ठळक मुद्दे १०० सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना (एआरटीओ) आठ आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारला १.८४ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. उर्वरित अधिकाऱ्यांनाही टप्याटप्यात ट्रेनिंगला पाठविण्यात येणार असल्याचे विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

जमीर काझीमुंबई - राज्य परिवहन विभागात नव्याने रुजू झालेल्या १०० सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना (एआरटीओ) आठ आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी राज्य सरकारला १.८४ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. विभागाची कार्यपद्धती व अद्यावत नियमावलीबाबत त्यांना अवगत केले जाणार आहे. येत्या शनिवारपासून पुण्यात सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) मध्ये सुरु होणाऱ्या प्रशिक्षणासाठी येणाऱ्या खर्चाच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.नव्याने भरती झालेल्या एकूण ८३२ ‘एआरटीओ’ना टप्याटप्यात ट्रेनिंग दिले जाणार असून पहिली १०० जणांची तुकडी शुक्रवारपासून कार्यरत होणार आहे.५६ दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणामध्ये एका दिवसासाठी एका अधिकाऱ्यावर ३ हजार ३०० रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना अद्यावत प्रशिक्षण मिळण्यासाठी त्यांना राज्यातील विविध संस्थामध्ये दोन वर्षाचे प्रशिक्षण आणि कार्यानुभव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नुतन ८३२ सहाय्यक निरीक्षकांना टप्याटप्याने ट्रेनिंग दिले जााणार आहे. पहिल्या शंभर अधिकाऱ्यांना सीआयआरटीमध्ये प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी एका दिवसाला एका अधिकाऱ्यावर ३३०० रुपये खर्च येणार आहे. त्यानुसार एकूण आठ आठवड्याच्या कालावधीसाठी पहिल्या तुकडीवर तब्बल १ कोटी ८४ लाख ८० हजार रुपये खर्चाला मंजुरी द्यावी, यासाठी परिवहन आयुक्तांनी ३१ ऑक्टोबरला गृह विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. खर्चिक बाब असल्याने तो प्रलंबित ठेवण्यात आला होता. मात्र २२ नोव्हेंबरपासून पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरु होणार असल्याने प्रस्तावाला मुंजरी मिळणे आवश्यक होते. त्यामुळे महत्वाची बाब समजून या प्रस्तावाला सोमवारी गृह विभागाने त्याला हिरवा कंदील दाखविण्यात आला. उर्वरित अधिकाऱ्यांनाही टप्याटप्यात ट्रेनिंगला पाठविण्यात येणार असल्याचे विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :आरटीओ ऑफीसगृह मंत्रालयमुंबई