Join us
Daily Top 2Weekly Top 5

सहायक पोलीस निरीक्षक परदेशींचा आॅनड्युटी मृत्यू

By admin | Updated: March 1, 2015 22:58 IST

उत्तनच्या केशवसृष्टीमध्ये भाजपा आमदारांच्या तीनदिवसीय प्रशिक्षणासाठी लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तातील सहायक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग

भार्इंदर : उत्तनच्या केशवसृष्टीमध्ये भाजपा आमदारांच्या तीनदिवसीय प्रशिक्षणासाठी लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्तातील सहायक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग तथुसिंग परदेशी (४८), रा. कृष्णा प्राइड, माऊलीनगर, नाशिक यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी सकाळी ७.१० वा.मृत्यू झाला. राज्यातील भाजपा आमदारांचे २७ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान प्रशिक्षण शिबिर आयोजिण्यात आले होते. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजपा मंत्री उपस्थित राहणार असल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. तत्पूर्वी २७ फेब्रुवारी रोजी मीरा-भार्इंदर पालिकेत महापौर निवडणूक होती. त्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा दुहेरी ताण जाणवत होता. या बंदोबस्तात परदेशी यांची २७ फेब्रुवारीला पालिका मुख्यालयात बंदोबस्तासाठी नियुक्ती केली होती. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांना त्याच दिवशी केशवसृष्टीतील बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले. बदलत्या ड्युटीचा ताण वाढल्याने त्यांनी भार्इंदर येथील खाजगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. त्यात त्यांचे सर्व वैद्यकीय रिपोर्ट साधारण आले होते. सततच्या ड्युटीनंतर परदेशी यांना शनिवारी विश्रांती देण्यात आली होती. रात्री पुन्हा बंदोबस्तावर हजेरी लावल्यानंतर रविवारी पहाटे ५ वा. सुमारास त्यांच्या पाठीत वेदना होऊ लागल्या. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा मृत्यू ओढावला.