ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुका सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी माजी सैनिक व सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचीदेखील मदत घेतली जाणार आहे. विशेष पोलीस अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक केली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा व पालघर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त केला जात आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासह निर्भय व शांततेच्या वातावरणात मतदारांना मतदान करणे शक्य व्हावे, यासाठी तैनात पोलिसांना हातभार लावण्यासाठी विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. यासाठी माजी सैनिक व सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.या मदतीसाठी ३५ ते ६५ वयोमर्यादा असलेल्या माजी सैनिकांसह सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना संधी दिली जाणार आहे.या विशेष पोलीस अधिकारीपदी निवड झालेल्यांना शासकीय नियमानुसार मानधन व प्रशस्तीपत्र दिले जाणार असल्याचे ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक राजेश प्रधान व पालघर पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी सांगितले. यासाठी इच्छुक माजी सैनिकांसह सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी ०२२-२५३९५१५१, २५३९५१५१ येथे संपर्क साधून आपली नावे तत्काळ नोंदवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
बंदोबस्तासाठी माजी सैनिकांसह सेवानिवृत्त पोलीस अधिका-यांची घेणार मदत
By admin | Updated: September 27, 2014 00:19 IST