मुंबई : पदपथावर आपल्या जागेवर झोपल्याच्या रागात महिलेने विजय हरीभाऊ बोरसे (वय ४९) यांच्या डोक्यात पेव्हरब्लॉक घातल्याची घटना शुक्रवारी घडली. त्याचदरम्यान गस्तीवर असलेल्या निर्भया पथकाने जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने महिलेचा शोध घेत तिला अटक केली आहे.
गोल मशीद चौकीजवळ निर्भया पथक थांबले असताना एक व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि त्याने एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती दिली. त्यांनी त्याच्याकडे धाव घेत त्याला जी. टी. रुग्णालयात दाखल केले. चौकशीत त्याचे नाव बोरसे असल्याचे सांगत, संगीता परदेसी नावाच्या महिलेने डोक्यात पेव्हर ब्लॉक मारल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच आझाद मैदान पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी जवळचे सीसीटीव्ही तपासले. त्यातील घटनाक्रम तपासल्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने बॉम्बे दर्गा परिसरातून पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत, बोरसे आपल्या जागेवर झोपला म्हणून त्याच्यावर हल्ला केल्याची कबुली तिने दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तिला अटक केली आहे.