Join us  

शाब्बास पोरी! मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱ्या आस्माची यशाला गवसणी; जगतेय संघर्षमय जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 12:21 PM

फुटपाथवर राहणारे लोक क्वचितच शिक्षण घेतात त्यामुळे मला माझ्या मुलीचा गर्व आहे असं आस्माचे वडील सलीम शेख यांनी सांगितले.

मुंबई – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला, या दहावीच्या परीक्षेत मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱ्या १७ वर्षीय आस्मा शेखनं यश मिळवलं आहे. या मुलीनं अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करत ४० टक्क्यांनी दहावीत पास झाली, तिचा संघर्ष पाहिला तर हे ४० टक्केही ९० टक्क्यांहून अधिक असल्याचं तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरुन तुम्हालाही समजेल.

याबाबत आस्मा शेखनं सांगितले की, मी शिक्षण घेण्यासाठी आयुष्यात प्रचंड मेहनत करत आहे. अभ्यास करण्यासाठी तिने रस्त्यावरील स्ट्रीट लाइटचा वापर केला आहे. रात्रीच्या वेळी गर्दी कमी असल्याने जास्तीत जास्त वेळ रात्रीचा अभ्यास करण्यावर भर दिला. पावसाच्या काळात अभ्यास करण्यास अनेकदा अडचणी येत होत्या. पण त्यावेळी वडिल राहण्यासाठी प्लास्टिकचं शेड बनवत असल्याचं तिने सांगितले.

तसेच मला जे मार्क्स मिळाले आहेत त्यापेक्षा अधिकची अपेक्षा केली होती, ४० टक्क्यांहून जास्त गुण मिळतील असं तिला वाटत होतं. पण जे गुण मिळाले त्यातही ती आनंदी आहे. यापुढील शिक्षण तिला आर्टस या विषयात घेण्याची इच्छा आहे. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक लोकांनी मला मदतीसाठी आश्वासन दिलं आहे. यापुढे आणखी मेहनत करण्यासाठी लोकांकडून प्रोत्साहन मिळत असल्याचं आस्मा शेखने सांगितले.

दरम्यान, आस्माने मेहनतीच्या जोरावर दहावी परीक्षेत चांगले मार्क्स मिळवून पास झाली त्यामुळे मी खूप आनंदी आहे. मी पहिलीपर्यंत शिक्षण घेतले आहे, फुटपाथवर राहणारे लोक क्वचितच शिक्षण घेतात त्यामुळे मला माझ्या मुलीचा गर्व आहे असं आस्माचे वडील सलीम शेख यांनी सांगितले. सलीम शेख यांच्याकडे नियमित रोजगार उपलब्ध नाही. मुंबईच्या रस्त्यांवर ज्यूस, मका विकून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.   

टॅग्स :दहावीचा निकालमुंबई