ठाणे : लोकमत आणि नॅशनल ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथील जीवन विकास शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या ‘अॅल्युर फॅशन शो’ या जिल्हास्तरीय स्पर्धेत मिस पालघरचा किताब अश्विनी पारडे यांनी पटकावला, तर झेबा शेख आणि श्रुती वर्तक यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.अभिनेत्री आणि मॉडेल मुग्धा गोडसे हिचा रॅम्प वॉक या स्पर्धेचे आकर्षण ठरला. अशा छोट्या स्पर्धांमधूनच करिअरची सुरुवात होत असते. पालघरसारख्या जिल्ह्यातून असे कार्यक्रम होणे महत्त्वाचे असल्याचेही मुग्धा गोडसे यांनी नमूद केले.पालघरमधील तरुणींना फॅशन डिझायनिंग, मॉडेल क्षेत्रातील दारे खुली होऊन त्यांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेच्या प्रथम फेरीत १०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. त्यातील १० स्पर्धक अंतिम फेरीत दाखल झाले. या १० स्पर्धकांना १२ दिवस रॅम्प वॉक, मेकअप अशा गोष्टींचे प्रशिक्षण मेघा संपत यांनी दिले. याचबरोबर त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासही मदत केली. या स्पर्धेचे सूत्रसंचालन अभिनेत्री समिरा गुजर आणि आर.जे रोहन जोशी यांनी केले. तर स्पर्धेचे परीक्षण डॉ. कविता गाडगीळ, डॉ. काळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धनश्री संख्ये, ललिता पाटील यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमास माजी मंत्री राजेंद्र गावित, प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अश्विनी पराडे ‘मिस पालघर’
By admin | Updated: May 6, 2015 23:34 IST